शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी या नायकाने दिले 16 कोटी रुपये

Vivek Oberoi

बॉलिवूडमधील कलाकार गरीब गरजू आणि विविध कारणांसाठी लोकांना मदत करीत असतात. कोरोना काळात ऋतिक, शाहीदकपूरसह अनेक नायकांनी फोटोग्राफर आणि बॅकस्टेज डांसर्सना पैसे आणि अन्नधान्याची मदत केली होती. अमिताभने तर शहीदांच्या कुटुंबियांना मदत केलीच होती, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही मदत केली होती. काही शेतकऱ्यांचे कर्जही त्यांनी भरले होते. विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या वाढदिवसाला कँसरग्रस्त मुलांना मदत करीत असल्याची माहिती आम्ही तुम्हाला नुकतीच दिली होती. आता विवेकने अजून एकदा त्याच्यातील भल्या माणसाचे दर्शन घडवले आहे.

आयआयटीत प्रवेश मिळावा यासाठी जेईई आणि अॅडव्हान्स परीक्षा मुलांना पास व्हावी लागते. आयआयटीसाठी अभ्यास तर खूप करावा लागतोच पण त्यासाठी पैसेही लागतात. त्यामुळेच अनेक गरीब परंतु हुशार मुले आयआयटीत प्रवेश घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन विवेक ओबेरॉयने अशा गरीब परंतु हुशार मुलांना तसेच शेतकऱ्यांच्या मुलांनाही आयआयटीत प्रवेश मिळावा यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. या मुलांसाठी स्कॉलरशिप देण्याची घोषणा त्याने केली असून यासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 16 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशातून विवेक ओबरॉय या मुलांना आयआयटीची परीक्षा क्रॅक करण्यासाठी मदत करणार आहे.

तीन वर्षांपूर्वी ऋतिक रोशनने ‘सुपर 30’ नावाचा सिनेमा केला होता. बिहारमधील गरीब मुलांना आयआयटीत प्रवेश मिळवून देण्यासाठी आनंद कुमार नावाच्या तरुणाची गाथा या सिनेमात मांडण्यात आली होती. या आनंद कुमारच्या धर्तीवर विवेक ओबेरॉय आयआयटीसाठी मुलांना तयार करणार आहे. आनंदकुमारच्या सुपर 30 कार्यक्रमावर आधारित विवेकने 90 व्हर्च्युअल लर्निंग सेंटर तयार केले आहेत. या सेंटरवर मुलांकडून आयआयटी आणि मेडिकलच्या एंट्रस परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे.

या प्रोजेक्टबाबत बोलताना विवेकने सांगितले, ‘एका गावातील मुलगा जेव्हा मोठा बनतो, तेव्हा तो केवळ त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव त्याच्यासोबत प्रगतीपथावर नेतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक हुशार मुले आहेत, पण पैसा आणि मार्गदर्शनाअभावी ते इंजीनियर बनू शकत नाहीत. कॉलेजला जाऊ शकत नाहीत. अशा हुशार विद्यार्थ्यांचे आयुष्य उपेक्षित राहू नये म्हणून मी हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. मी आणि माझी टीम या मुलांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी मदत करणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER