सोलापूरची वाढती रुग्णसंख्या ही नवी चिंता

Solapur Corona Virus - CM Uddhav Thackeray Meeting

एकीकडं पुण्यात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच बरे होणाऱ्यांचं प्रमाणंही वाढतंय. त्याबरोबरच चिंतेची बाब अशी आहे की आता केवळ शहराच्या पूर्व भागातच नाही तर मध्य भागातही आणि दक्षिण भागातही संशयित आणि रुग्णसंख्या वाढलीय. मुंबईसारखंच पुण्यातही करोना कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूरमधे रुग्णांची वाढलेली संस्था ही प्रशासनासाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.

सोलापुरातल्या मित्रांकडून, अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केल्यावर धक्कादायक बाबी समजल्या आणि त्या मांडायलाच हव्यात असं प्रकर्षानं जाणवलं. सोलापुरात पुण्याप्रमाणंच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमधे ताळमेळ नसणं हे तर प्रमुख कारण आहेच पण त्याहीपेक्षा सरकारनं दहा-बारा लाख लोकसंख्येचं सोलापूर अक्षरशः रामभरोसे चालवलं जाईल तसं चालवा, या पद्धतीनं दुर्लक्ष केलंय. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालिका आयुक्त यापैकी कोणाचाच कोणाला मेळ नाही. विशिष्ट भागातून करोना संशयित आणि रुग्ण आढळताहेत, सोलापूरमधे सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था तर खूपच वाईट आहे. पीपीइ किटअभावी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच निकृष्ट कीट वापरून काम करायची वेळ आलीय.

सोलापुरात ओप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पहिला करोना रुग्ण आढळला आणि आजपर्यंत रुग्णांची संख्या सहाशेपर्यंत तर मरण पावलेल्यांची संख्या ५०च्या वर गेलीय पण गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या खूप वाढतीय. त्याहीपेक्षा चिंताजनक बाब म्हणजे आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. या सर्व चिंताजनक बाबींमधे आशादायक बाब म्हणजे रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण रोगाची लागण होण्याच्या प्रमाणापेक्षा खूपच जास्ती आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४५ टक्क्यांपेक्षा जास्ती आहे पण मृयुत्यूदर कमी करणं हेही सोलापुरातलं आव्हान असणार आहे.

सोलापुरातून सुशीलकुमार यांच्यासारखा नेता राज्यात अनेक महत्त्वाची खाती सांभळाणारे मंत्री म्हणून तसंच मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते आहेत आणि ते केंद्र सरकारचे गृहमंत्रीदेखील होते पण आज सरकारमे असूनही सोलापूरकडे सरकारनं म्हणावं तितकं लक्ष दिलेलं नाही, हे सोलापूरमधल्या बातम्यांवरूनच स्पष्ट होतंय. सोलापूर शहराला राज्यात सत्तापालट झाल्यापासून गेल्या केवळ सहा महिन्यात तीन पालकमंत्री देण्यात आले आहेत. सध्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरचे आहेत. ते आठवड्यातून एकदा सोलापूरला भेट देतात आणि अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती प्रेसवाल्यांना बोलावून वाचून दाखवतात पण त्यांना शहरात उपाययोजना काय करायला हवी, याबाबत काहीही विचारता येत नाही कारण त्यांना फारशी माहिती नसते, असा पत्राकारांचा अनुभव आहे.

तीच गोष्ट जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांबद्दलही स्थानिक पत्रकार सांगतात. अनेकांनी शहराच्या आयुक्तांना शहराची माहिती नसल्याबद्दलचं आणि प्रश्नांची जाण नसल्याबद्दलचं लिखाण केलंय. आयुक्त दीपक तावरे सहकार खात्यातून पालिका आयुक्तपदी आलेत आणि अगदी कंटेन्मेंट झोनमधे स्वःता जाऊन ते करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्नही करत आहेत पण सिव्हिल हॉस्पिटलमधे आरोग्य सेवा पुरवताना किमान स्वच्छता असणं, स्वच्छतागृहांची अवस्था, आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी, पोलिसांची आरोग्यदृष्ट्या पूर्वकाळजी या व अशा अनेक बाबींवर स्थानिक माध्यमांमधील प्रतिनिधी प्रश्न विचारत आहेत. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक समन्वयाचा मुद्दा पुण्याप्रमाणेच सोलापूरमधेही आहे. त्यामुळं आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत सोलापूरच्या वाढत्या रुग्णसंख्येबद्दल दखल घेतल्याचं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. त्यामुळं आता तरी सोलापूरवासीयांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी अपेक्षा करू या…

शैलेन्द्र परांजपे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER