साक्षीदार फुटण्याचे वाढते प्रकार हा न्यायव्यवस्थेला जडलेला कर्करोग

Aurangabad HC
  • कडक कारवाई करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

औरंगाबाद : अभियोग पक्षाने उभे केलेले साक्षीदार फुटण्याचे (Hostile Witneses) आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडावे लागण्याचे प्रकार वाढीस लागले असल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली असून फौजदारी खटले चालविणार्‍या राज्यातील न्यायालयांनी, काही बाह्य कारणांनी (Extraneous Considerations) साक्षीदार फुटल्याचे निदर्शनास आल्यास अशा साक्षीदारांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.

न्या. रवींद्र घुगे व न्या. भालचंद्र देबडवार यांच्या खंडपीठाने म्हटले की, साक्षीदार फुटण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही तसेच न्यायालयांनीही या बाबतीत हतबलता दाखवून चालणार नाही. आम्हाला प्रत्यही दररोज, प्रत्येक प्रकरणात साक्षीदार फुटण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे व अशा फुटणार्‍या   साक्षीदारांचे निर्ढावलेपण वाढत असल्याचे आम्हाला दिसत आहे. साक्षीदार फुटण्याची धमक्या, धाकदपटशा आणि दबाव यासह इतरही कारणे असू शकतात. साक्षीदार फुटणे आणि आपण फुटलो तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही, असा त्यांनी समज करून घेणे ही गंभीर चिंतेची बाब आहे.

खंडपीठाने पुढे म्हटले की, बाह्य कारणांनी साक्षीदार फुटणे हा न्यायप्रक्रियेतील केवळ एक अपाय न राहता तो ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेस व न्यायव्यवस्थेस जडलेला कर्करोगही ठरू शकतो. केवळ कायद्याचा धाक दाखवून कायद्याचे पालन करण्यास भाग पाडता येत नाही. साक्षीदार फुटण्याकडे (यापुढे) दुर्लक्ष केले जाणार नाही असा सज्जड संदेश समाजात जाण्यासाठी अशा सर्व प्रकरणांमध्ये फुटणार्‍या साक्षीदारांवर कारवाई करण्याची आता वेळ आली आहे.

याच उद्देशाने फौजदारी खटले चालविणाºया राज्यातील सर्व न्यायालयांना याची जाणीव करून देण्यासाठी हे निकालपत्र सर्व जिल्ह्यांच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे माहितीसाठी पाठविण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. अंबाजोगाई शहराच्या रविवार पेठेतील गवळी गल्लीत राहणाºया सरस्वती लांडगे या ७५ वर्षांच्या वृद्धेस, तिचे पती गणपत लांडगे यांचा खून केल्याच्या खटल्यातून, असेच साक्षीदार फुटल्याने नाईलाजाने निर्दोष सोडावे लागल्यानंतर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या खटल्यात अभियोग पक्षाने उभे केलेले सातपैकी पाच साक्षीदार फुटूनही अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सरस्वतीला खुनाबद्दल दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली होती. परंतु फुटलेल्या साक्षीदारांच्या साक्षी विचारात घेता गणपत यांचा खून खरंच सरस्वतीने केला असावा याविषयी गंभीर संशय निर्माण होतो, असे म्हणत खंडपीठाने तिला निर्दोष सोडले. सत्र न्यायालयातील पब्लिक प्रॉसिक्युटरने हा खटला अगदीच सुमार पद्धतीने चालविला व फुटलेल्या साक्षीदारांची उलटतपासणीही योग्यपणे घेतली नाही, असे ताशेरेही खंडपीठाने मारले.

या खटल्यात ज्याने आपल्या वडिलांना आईने ठार मारल्याची फिर्याद पोलिसांकडे नोंदविली होती त्या तुकाराम या गणपत व सरस्वती यांच्या एकुलत्या एक मुलासह संजय रंगनाथ लांडगे, शिवराम नरसु शेवाळे, श्रीकृष्ण मडके आणि हिम्मत भागुराव काळे हे पाच साक्षीदार फुटले होते. या सर्वांवर सत्र न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३४० अन्वये कारवाई करावी, असा आदेश दिला गेला. राज्यातील इतर न्यायालयांनाही कायद्याच्यआ याच कलमान्वये फुटणार्‍या साक्षीदारांविरुद्ध कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER