कांदाप्रश्न : शेतकरी आज राजभवनावर; संवेदनशील मनाचे राज्यपाल शेतकऱ्यांंनाही न्याय देतील

Farmers Onion-Bhagat singh koshyari

मुंबई : कांदा निर्यातीवरील (Onion Export) बंदीच्या निर्णयाने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे अखेर शेतक-यांनी आता संवेदनशील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. राज्याचे वडीलधारी, प्रमुख या नात्याने अनेक जण राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपले दुखणे सांगत असतात. त्या सर्वांना राज्यपाल वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता शेतक-यांचे (Farmers) मंडळदेखील राज्यपालांना भेटून आपले दुःख त्यांच्यापुढे व्यक्त करणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अतिशय संवेदनशील मनाचे आहेत. अन्याय निवारण्याच्या भावनेने त्यांच्याकडे दाद मागणाऱ्यास ते नक्की भेट देतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सैनिकास भेट दिली. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका कंगना रणौत हिचे मुंबईतील कार्यालय महापालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेट दिली. इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे राज्यपाल मध्यस्थी करून शुक्रवारी आम्हाला ते नक्कीच भेट देतील, अशा शब्दांत शेतकरी संघर्ष संघटनेने कांदाप्रश्नी राज्यपालांच्या भेटीची मागणी केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी या संदर्भात निवेदनाद्वारे आणि सोशल मीडियातील एका व्हिडीओद्वारे आवाहन केले आहे. ते म्हणतात, १४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली.

या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. सरकारने स्वत:च बनविलेल्या नियमनमुक्तीच्या कायद्यास निर्यातबंदीच्या निर्णयाने फाटा देत शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. अन्यायाची भावना असलेले अनेक लोक राज्यपाल महोदयांची भेट घेतात. राज्यपालदेखील संवेदनशील मनाचे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांना भेटी देऊन त्यांनी त्यांच्या अन्याय निवारणार्थ प्रयत्नही केले आहेत. कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. एक प्रकारे केंद्र सरकारने घरावर दरोडा घातल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आमची समस्या रास्त असल्याने राज्यपाल हे केंद्राकडे आमचा मुद्दा नक्कीच नेतील व जशी कंगनास भेट दिली तशीच ते आमच्या शेतकरी शिष्टमंडळासही देतील, याबाबत खात्री असल्याचे वडघुले यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER