हायकोर्टाच्या ‘त्या’ निकालाविरुद्ध सरकारने तातडीने अपील करावे

Nagpur High Court - NCPCR
  • राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे मुख्य सचिवांना पत्र

मुंबई : अल्पवयीन मुलीला विवस्त्र न करता तिच्या छातीवरून हात फिरविणे किंवा तिची वक्षस्थळे दाबणे हा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO Act) कलम ७ अन्वये ‘लैंगिक अत्याचारा’चा(Sexual Assault) गुन्हा ठरत नाही, या मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या निकालाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने तातडीने अपील दाखल करावे, अशी विनंती राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने केली आहे.

आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी अशा आशयाचे पत्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठविले आहे. त्यात आयोगान म्हटले आहे की, या प्रकरणात अभियोग पक्षाने पीडित मुलीची बाजू ‘पॉक्सो’ कायद्याचय मूळ संकल्पनेस धरून योग्य प्रकारे मांडली नसावी, असे वाटते. अभियोग पक्षाने योग्य दृष्टिकोनातून विचार केला असता तर कदाचित या गंभीर गुन्ह्यातून न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केलेही नसते.

शिवाय आरोपीने लैंगिक भावना मनात ठेवून लैंगिक समागमाखेरीज अन्य प्रकारच्या केलेल्या कृतीत आरोपी व पीडित मुलगी यांच्यात थेट शारीरिक संपर्क (Skin to Skin Contact ) आला असेल तरच तो ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा ठरतो हा निकालपत्रात नोंदविलेला अभिप्राय पीडित  बालिकेची अप्रतिष्ठा करणारा आहे, याचीही राज्य सरकारने नोंद घ्यावी, असेही आयोगाने पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचा संदर्भ देऊन आयोग म्हणतो की, कदाचित त्या पीडित मुलीची ओळख उघड केली गेली असावी असे दिसते. तसे झाले असेल तर ही बाबही गंभीर असून सरकराने त्यादृष्टीनेही योग्य ती पावले उचलावीत. त्या पीडित मुलीचा संपूर्ण तपशील सरकारने आयोगाला कळवावा जेणेकरून तिला कायदेविशयक मदतीखेरीज अन्य प्रकारची मदत करणेही शक्य होईल,असेही पत्राच्या शेवटी नमूद केले गेले आहे.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठावरील न्यायाधीश न्या पुष्पा गनेडीवाला यांनी सतीश वि. महाराष्ट्र सरकार (फौजदारी अपील क्र.१६१/२०२०) या  प्रकरणात हा निकाल दिला होता. त्यांनी आरोपी सतीश याचे अपील मंजूर करून त्याला ‘पॉक्सो’खालील गुन्ह्याऐवजी भादंवि कलम ३५४ अन्वये बळाचा वापर करून स्त्रिचा विनयभंग करणे या तुलनेने कमी गंभीर गुन्ह्यासाठी कमी शिक्षा  दिली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER