सरकारी अधिकाऱ्याला मिळालं देवत्तव, आता त्यांच्या नावानं भरते अनोखी जत्रा!

Dev Mamledar Yashavantrao Maharaj Temple

राज्यात कोरोनाचा (Corona) वाढता प्रसार बघता लोकं मोठ्याप्रमाणात लोक जमतील अशा ठिकाणी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलीयेत. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे तिथं कडक निर्बंध घालण्यात आलेत. अमरावती शहरात सात दिवसांचा लॉकडाउन जाहीर केलाय तर मुंबईत इमारती सील करण्यात आल्यात.

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक गावच्या यात्रा जत्रही रद्द करण्यात आल्यात. राज्यात वेगवेगळ्या देवी देवतांच्या वर्षातून एकदा जत्रा भरतात. कधी कधी त्या एक दिवसाच्या तर कधी त्या आठवडाभरही चालतात पण एक असं गाव आहे जिथं देवाची नाही तर एका शासकीय अधिकाऱ्याच्या नावानं जत्रा भरते.

महाराष्ट्रात भरणार्‍या जत्रा आपल्या लय जिव्हाळ्याचा विषय असतो. देवाच्या नावानं महाराष्ट्रात जत्रा भरत असतात. जत्रेत गेला नाही असा माणूस महाराष्ट्रात क्वचितच सापडेल, जत्रेत गेला नाही, पळण्यात बसला नाही, ही काय जिंदगीहे का राव? जाऊद्या जो जत्रेत गेला नाही त्याच्याविषयी आपल्याला बोलायचंच नाही. आपल्याला बोलायचंय महाराष्ट्रातल्या एका आगळ्यावेगळ्या जत्रेविषयी…

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा गावात देवाच्या नाही तर एका सरकारी अधिकार्‍याच्या नावानं जत्रा भरते. यशवंतराव भोसेकर असं त्या अधिकार्‍याचं नाव. आता सरकारी आधिकार्‍याच्या नावाने जत्रा का भरते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. सांगतो ना सगळं सांगतो…

त्याचं झालं असं, सोलापूर जिल्ह्यातल्या भोसे गावात एका ब्राम्हण कुटुंबात यशवंतराव महाराज जन्माला आले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांच्या मामाने खटपट करून त्यांना महसूल खात्यात ‘कारकून” म्हणून नोकरी लावून दिली. सुंदर हस्ताक्षर आणि कामाबाबत प्रामाणिक असलेले यशवंतराव महाराज नोकरीत प्रगती करत गेले, आणि त्यांना प्रमोशन मिळत गेलं.

इ. स. 1869 साली इंग्रजांनी सटाणा म्हणजेच ‘बागलाण’ तालुक्यात स्वतंत्र कचेरी स्थापन केली गेली, आणि बागलाणचे पहिले मामलेदार म्हणजेच तहसिलदार झाले यशवंतराव भोसेकर.

त्याकाळी तालुक्यात प्रचंड दुष्काळ होता. लोकांवर उपासमारीची वेळ आलेली होती. अशा परिस्थितीत तालुक्याची जबाबदारी मामलेदारांवर होती. दुष्काळग्रस्तांसाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या. अनेक उपक्रम राबवूनही काही फरक पडत नाही हे बघून त्यांनी आपली सगळी संपत्ति विकून टाकली आणि गरिबांमध्ये वाटून दिली. तालुक्यातल्या दुष्काळाची भीषणता खूप जास्त होती. आपली संपत्ती विकूनही फरक पडत नाही हे बघून मामलेदारांनी मोठं पाऊल उचललं. तालुक्याच्या सरकारी तिजोरीत मोठी रक्कम होती. सरकारी तिजोरीतले जवळपास १ लाख २७ हजार रुपये (त्याकाळचे) त्यांनी गरिबांमध्ये वाटून टाकले. यानंतर जे घडलं त्याबद्दलची आख्यायिका आजही सटाणा तालुक्यात संगितली जाते.

सरकारी तिजोरीतले पैसे गरिबांमध्ये वाटून टाकल्याची गोष्ट जेव्हा वरिष्ठांना कळली तेव्हा ते तिजोरी तपासण्यासाठी आले. जेव्हा तिजोरी उघडली तेव्हा मात्र सर्व रक्कम जशीच्या तशी असलेली आढळली. हा परमेश्वराने केलेला चमत्कारच आहे असा आजही गावकर्‍यांचा समज आहे.

गोरगरीबांसाठी प्रचंड मेहनत घेणारे आणि स्वत:ची संपत्तीसुद्धा लोकांसाठी विकायला मागे पुढे न बघणार्‍या मामलेदारांना लोक देवाचा अवतार समजायला लागले आणि त्यांना ‘देव मामलेदार यशवंतराव महाराज’ म्हणू लागले.

पुढे ते गेल्यानंतर सटाण्यात देव मामलेदारांच भव्य मंदिर बांधण्यात आलं. त्यांच्या मंदिरात नारळ फोडून आणि आरती करूनच सटाण्यात आजही जत्रेला सुरुवात होते. जत्रेच्या पहिल्या दिवशी देव मामलेदारांची रथ यात्राही निघते.

एका सरकारी अधिकार्‍याच्या नावानं भरणार्‍या या आगळ्या-वेगळ्या जत्रेला अवश्य भेट द्या, उत्तर महाराष्ट्रातल्या संस्कृतीचाही अनुभव घेता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER