कोणत्याही देशाच्या सरकारने शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेले नाही

- सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण

PM Narendra Modi - Farmers Protest

दिल्ली : कोणत्याही देशातील सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) समर्थन दिलेले नाही, अशी माहिती सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली.

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलीली (Imtiyaz Jaleel) यांनी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या देशांची यादी असेल तर ती सरकारने जाहीर करावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना सरकारने म्हटले की, कोणत्याही देशातील सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेले नाही मात्र, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांमधील भारतीय वंशाच्या ‘काही प्रेरित’ व्यक्तींनी या कायद्याला विरोध दर्शवला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री वी. मुरलीधरन म्हणालेत की, भारताचे मित्र राष्ट्र असलेल्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर वक्तव्य केले होते. त्रुडो यांच्या या वक्तव्यानंतर भारताने त्यांना भारताच्या अंतर्गत प्रकरणांसंदर्भात अशाप्रकारचे वक्तव्य हे अयोग्य आणि स्वीकार करण्यासारखे नाही, असे सांगितलं होते.

अमेरिकन पॉप स्टार रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्याने ज्या दिवशी गोंधळ झाला त्याच दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. रिहाना तसेच पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसारख्या व्यक्तींनी केलेले ट्विट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध अपप्रचार करण्याचा डाव आहे. भारताची आणि भारत सरकारची बदनामी करण्यासाठी हे केले जात आहे, असा दावा भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी केला. परराष्ट्र मंत्रालयानेही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींसदर्भात स्पष्टीकरण दिलं. या सेलिब्रिटींकडून केली जाणारी वक्तव्य ही योग्य आणि जबाबदार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER