सरकार लक्ष देत नाही, स्वखर्चातून उभारणार आगरी कोळी-वारकरी भवन – मनसे

MNS

कल्याण : मुंबई ही मुख्यत्त्वे आग्री लोकांची मुंबई म्हणून ओळखली जाते. कोळी बांधव आणि आग्री लोकांचे मुख्य वास्तव्य हे मुंबईत आहे. मात्र, देशभरातून आलेले लोक मुंबईत आपली पाळं मुळं रोवत आली तरी मुळ मुंबईकरांनाच अद्याप अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागलं आहे. या कोळी आग्री बांधवांसाठी मनसेने मदतीचा हात पुढे केला आहे.

कल्याण (Kalyan) ग्रामीण भागातील खोणी इथं आगरी कोळी आणि वारकरी भवन (Aagri Koli Warkari Bhavan) स्वखर्चातून उभारणार असल्याची माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील आगरी साहित्यीकांनी आमदार राजू पाटील यांची आज त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ही माहिती दिली. आगरी कोळी आणि वारकरी भवनाचे भूमीपूजन 19 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्याची मागणी समाज बांधवांकडून वारंवार केली जात आहे. सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे स्वखर्चातून हे भवन उभारण्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. साहित्यिक सर्वेश तरे, भुमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील, गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांना आगरी-कोळी बोलीला ‘राजाश्रय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली.

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतना-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ आणि ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे. आगरी-कोळी बोलीतील साहित्य निर्मीतीला प्रोत्साहन द्यावं यासाठी शासनाच्या माध्यमातून शिबिरं राबवणे, बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्थरीय संशोधन केंद्रे निर्माण करणे, नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आगरी-कोळी भाषा आणि तिचे दुर्मिळ साहित्य ‘ग्लोबल’ करणे, या मागण्या यावेळी साहित्यीकांनी आामदार पाटील यांच्याकडे केल्या.

या भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालयं, आगरी कोळी लोकगितांच्या रेकॉडिंगसाठी अत्याधुनिक स्टुडियो, वारकऱ्यांकरीता वास्तव्य करण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER