करोना इतिहासजमा होण्याचे शुभवर्तमान…

Shailendra Paranjapeकरोना (Corona) हळूहळू इतिहासजमा होत जाईल, अशी चिन्हं स्पष्टपणे दिसू लागलीत. केंद्र सरकारने (Central Government) आता चित्रपटगृहे नाट्यगृहे यांच्यासाठी पन्नास टक्के आसनक्षमतेची मर्यादा वाढवण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यासाठी जाहीर केलाय. त्यामुळे नाट्य-चित्रगृहांचे उत्पन्न वाढू शकेल, असा अंदाज आहे. त्याबरोबरच जलतरण तलाव केवळ राष्ट्रीय, आंतरराज्य किंवा स्पर्धाजलतरणातल्या स्पर्धकांसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांसाठीही खुले केले जात आहेत.

केंद्र सरकारनं मार्च २०२०च्या शेवटी, एप्रिल महिन्यात आणि मे महिन्यात लागू केलेले लॉकडाऊन (Lockdown) केवळ महत्त्वाचे आणि निर्णायकच होते, असे नव्हे तर त्याचे टायमिंगही अचूक होते, हे आता सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्या दोन फेसबुक जनसंवादांनंतर आता लॉकडाऊन शिथिलीकरणासंदर्भात स्थानिक पातळीवर आणि अगदी जिल्हापातळीवर निर्णय घ्यायला हवेत, हेही सांगितले होते. अर्थात, केंद्र सरकारनं जुलै महिन्यात दिल्लीत चित्रपटगृहे, शाळा सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात तसे निर्णय लगचेच झाले नाहीत. पण मुळात २०२० या संपूर्ण वर्षावरच करोना किंवा कोविड २०१९चं पदचिन्हं काळाकडूनच कायमचं कोरण्यात आलेलं आहे. त्यामुळे २०२० हे वर्ष दुःस्वप्नाप्रमाणे गेलं आहे आणि नवं वर्ष खरोखर अखिल मानवजातीला सर्वार्थाने नवं जगायला शिकवणारं ठरणार आहे.

करोनामुळे जगण्याची परिमाणंच बदलून गेली आहेत. त्याचा उहापोह यापूर्वीही या लेखमालेतून केलेला आहे. पण आता केंद्र सरकारच्या नाट्यचित्रगृहे आणि जलतरण तलावांसह खऱ्या अर्थाने पुनप्रारंभाची घोषणा होत आहे. आता जीवनातली जवळपास सर्व क्षेत्रं खुली झाली आहेत आणि मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराची लाइफलाइन असलेली मुंबईकरांची लोकल सेवा सुरू होणं काय ते बाकी आहे.

वास्तविक, चित्रपटगृहे यापूर्वीच पन्नास टक्के क्षमतेने सुरू करायला परवानगी मिळालेली आहे. पण ऑनलाइनची सवय, मोबाईल तसंच लँपटॉपवरून वर्क फ्रॉम होमच्या सक्तीमुळे लोक करमणूकही घरी बसून टीव्ही, लँपटॉपच्या स्क्रीनवरून करून घेऊ लागलेत. त्याची एक सवयच होऊन बसलीय. त्यामुळेच आता चित्रपटृहे, मल्टिप्लेक्स सुरू झाले तरी प्रेक्षक सिनेमा बघायला येत नसल्याने चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना चित्रपट बनवून तयार आहेत पण प्रदर्शित करता येत नाहीयेत, अशी अवस्था आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे यामधे काहीशी सुधारणा होऊ शकेल, अशी आशा आहे.

चित्रपटांच्या तुलनेत नाटकांची स्थिती चांगली आहे. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर हे त्यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या तिकीटविक्रीच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहिले होते आणि त्यांचा पुण्यातला पहिला प्रयोग पन्नास टक्के क्षमतेत हाऊस फुल्ल झाला. तीच गोष्ट भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही या विक्रमी नाटकाची. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वाइड विंग्ज ही युवकांची संस्था नाट्यसत्ताक नावानं नाटकांचा आणि नाटकाशी संबंधित उपक्रमांचा महोत्सवच भरवतात. त्यालाही प्रेक्षकांनी रात्री दोन अडीच वाजेपर्यंत प्रयोग बघत उदंड हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. त्यामुळे नाट्यचित्रगृहांच्या वाढीव आसनक्षमतेनिशी परवानगीच्या निर्णयाचा या दोन्ही क्षेत्रांना निश्चितच फायदा होईल. न्यू नॉर्मलच्या दिशेने एक पाऊल पुढे असंच याचं वर्णन करावं लागेल.

पुण्यामधे खासगी मोटारीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातल्या व्यक्तींनी मुखपट्टी अर्थात मास्क घालण्याची सक्ती काढून टाकण्यात आली आहे. अर्थात, बुद्धिमान आणि कायद्यावर बोट ठेवणारे पुणेकर या निर्णयाचा फायदा घेत, आमचे मित्र हे आमचे कुटुंबीयच आहेत, हा दावा करत मोटारीतून बिनामास्क फिरू लागले आहेत. पोलिसही त्याकडे कानाडोळा करू लागलेले आहेत. पुण्यात आता दुचाकीस्वारांसाठी असलेली मास्कची सक्तीही काढून टाकण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त प्रसारित झालेय.

गाडीतले किंवा गाडीवरचे मास्क असोत की नाट्यचित्रगृहातले सोसेल इतके अंतर, करोना हळूहळू इतिहासजमा होणार, याची ही शुभचिन्हंच आहेत. संपूर्ण वर्ष भयग्रस्ततेत घालवल्यानंतर आणि एकीकडे हिमालयातली थंडी महाराष्ट्राकडे येत असतानाच नवी दिल्लीकडून आलेल्या या करोनासंदर्भातल्या जवळपास निर्णायक शुभवर्तमानाचं स्वागतच करायला हवं.

Disclaimer :’संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER