खुशखबर : देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घट

Unemployment Rate Down

नवी दिल्ली : ‘सीएमआयई’ (CMIE) (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) ही संस्था देशातील बेरोजगारीचा सर्वे करते. दररोज त्या आकड्यांचा आलेख जाहीर करते. देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घट झाली असून, सात कोटी लोकांना नव्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. कंपनी उत्पादनांत आणि नफ्यातही वाढ होत आहे. संस्थेच्या ऑक्टोबरच्या अहवालानुसार 23 ऑक्टोबर 2020 रोजी देशाचा बेरोजगारीचा दर 6.8 टक्के इतका खाली होता. एप्रिल 2020 मध्ये हाच दर 23.52 टक्के इतका सर्वाधिक होता. मात्र, गेल्या बारा महिन्यांतील 6.8 टक्के हा दर सर्वात नीचांकी दर ठरला आहे.

अनलॉकनंतर देशातील उद्योगचक्र वेगाने सुरू झाले. यात बांधकाम, कृषी, सेवा, ऑटो, स्टील, हॉटेल, किरकोळ व्यापार, वाहतूक, मोठे उद्योग, लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग यामध्ये ऑटो, इलेक्ट्रॉनिक, कापड, रिटेल, रिअल इस्टेटसंबंधित उद्योग सुरू झाल्याने रोजंदारीची कामे वाढली. तसेच कर्मचाऱ्यांचे थांबलेले काम सुरू झाले. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे 7 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. हा आकडा अनौपचारिक नोकऱ्यांचा आहे. ‘सीएमआयई’सह जागतिक कामगार संघटना, इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड आणि अनेक खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून हा आकडा समोर आला आहे.

अर्थचक्राला गती देण्यात दसरा खरेदीनेही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसते. दसर्याला वाहन खरेदी चांगली झाली. यंदा बाजारात चारचाकी, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड बाजारात मोठी उलाढाल झाली. त्याचा परिणाम लोकांच्या हाती पैसा येण्यात सुरुवात झाली आहे.

गेल्या मार्चनंतर कोरोना (Corona) महामारीने उद्ध्वस्त केलेले अर्थकारण आता गतीने सावरत आहे. उद्योगचक्र हळूहळू सुरू झाले. त्यानंतर दसऱ्याने बाजारात चैतन्य आणले. आता दिवाळी तोंडावर असतानाच व्यापाराला गती मिळाली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

घटलेल्या बेरोजगारीची गेल्या 12 महिन्यांतील ही रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे.देशाचा बेरोजगारीचा दर 23 ऑक्टोबर रोजी 6.8 टक्के इतका सर्वात नीचांकी ठरला आहे. अर्थात, रोजगारातील ही वाढ अनौपचारिक नोकरीतील आहे. यात 14.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पगारी नोकऱ्यांच्या दरात मात्र धीमी वाढ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER