जगण्यातलं बरं-वाईट आणि कोरोना

Covid Paitent

Shailendra Paranjapeआयुष्यात बऱ्यावाईट गोष्टींना सामोरं जावंच लागतं; कारण आयुष्य फक्त चांगलं किंवा फक्त वाईट नसतं. किंबहुना आयुष्यात बऱ्यावाईटाची संमिश्रता असते म्हणून तर जगण्यात मजा आहे, जगण्याला अर्थ आहे. आयुष्यभर नुसताच आनंद किंवा नुसतंच दुःख अशी स्थिती असणं कल्पनेपलीकडचे आहे तसंच जीवनातली काही वर्षे नुसता आनंद आणि काही वर्षे नुसते दुःख, अशा आयुष्याची कल्पना करणंही अवघड आहे.

सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अशाच बऱ्यावाईट घटना समोर येताहेत. काही दिलासा देणाऱ्या तर काही उद्विग्न करणाऱ्या. वाईट घटनांमधून काय करू नये, हे शिकायचं तर सकारात्मक दिलासादायक गोष्टींमधून कोरोना काळात जगण्याचं बळ मिळवायचं, इतकंच आपण करू शकतो. करायला हवं.

कोरोनाच्या वाढत्या भीतीच्या काळात एक सकारात्मक बातमी आलीय. ती म्हणजे पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपेक्षा एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा होता. ही गोष्ट दोन दिवसांपूर्वीची असली तरी गेले काही दिवस कोरोनासंदर्भात मनात चिंता निर्माण होईल, अशा बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतानाच्या काळात जिल्हापातळीवर बरे होणाऱ्यांची संख्या वाढणं, हे निश्चितच दिलासा देणारं आहे.

कोरोनाची लस येईपर्यंत मास्क, सॅनेटायझर आणि ‘दो गज की दूरी’ पाळणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. याचाच अर्थ लस लवकर येईल, अशी चिन्हं नाहीत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरू करतानाच ही पथ्यं पाळणं आपल्या सर्वांसाठी हितकर आहे. कोरोनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसरी लाट येणार, असं सांगितलं असल्यानं वैयक्तिक काळजी घेणं हाच कोरोनावरचा सर्वोत्तम उपाय आहे, हेही लक्षात घ्यायला हवं.

गेले काही दिवस रेमडिसिव्हरच्या उपलब्धतेवरून सुरू असलेल्या चिंतेच्या वातावरणातही एक बातमी काहीशी चिंता कमी करणारी ठरलीय. ती म्हणजे कोरोनासंदर्भात रेमडिसिव्हरची इंजेक्शने उपलब्ध आहेत की नाहीत, यावरून प्रशासनानं अखेर सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडे असलेल्या साठ्याची माहिती जाहीर करण्यास सांगितले आणि आता रेमडिसिव्हर उपलब्ध आहे, हेही स्पष्ट झालेय. मात्र, असं असलं तरी रुग्णांच्या नातेवाइकांना गेले अनेक दिवस दुकानांचे उंबरठे झिजवावे लागले, ही वस्तुस्थिती आहे आणि रेमडिसिव्हरचा काळाबाजार, त्यातले लाभार्थी यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी.

पुण्यामध्ये जम्बो कोविड सेंटरवरून सरकार, स्थानिक प्रशासन आणि पुणे महापालिका या सर्वांनाच टीकेचे धनी व्हावं लागलं होतं. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचं घाइगर्दीनं केलेलं उद्घाटन, त्यातून उद्भवलेले कसोटीचे प्रसंग यातून प्रशासन पुरेसं बाहेर येतंय न येतंय तोच आणखी एक प्रकार जम्बो कोविड सेंटरमध्ये घडलाय. जम्बो कोविड सेंटरमध्ये पांडुरंग रायकर या टीव्ही पत्रकाराचा मृत्यू झाला, त्यानंतर जम्बो कोविड सेंटरमधून एक महिला रुग्ण गायब झाली आणि नंतर सापडली, या दोन घटनांनंतर आता जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरच्या विनयभंगाचाही प्रकार घडला आहे. यासंदर्भात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. त्यामुळं जम्बो कोविड सेंटर हे प्रशासनासाठी जम्बो संकट सेंटर होऊ लागलंय.

कोरोनासंदर्भात २४ तासांत समोर आलेल्या या काही चांगल्या-वाईट घटनांच्या बातम्या; पण आधी सांगितल्याप्रमाणे जगणं फक्त चांगलं किंवा फक्त वाईट असत नाही तसंच वृत्तपत्रं समाजाचा आरसा बनून समाजाला समाजाचा चेहरा दाखवत असतात. आपल्या चेहऱ्यावर असलेला उजळपणा कसा जपला जाईल आणि चेहरा बेरंग करणाऱ्या घटना कशा टाळता येतील, याचा विचार करून चेहरा चांगला करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER