” मॉलची झगमगीत दुनिया !”

Mall life

आज सुधाताई (Sudhatai) लवकर आटोपून बाहेर पडणार होत्या. अनुष्का अजून उठली नव्हती. कालच रात्री सुधाताईंकडे म्हणजे माहेरी आली होती पोर. त्यांनी एकदा डोळे भरून तिचा चेहरा बघितला. आवाज होऊन तिची झोपमोड होऊ नये, म्हणून दरवाजा ओढून घेतला. तिला आवडतात म्हणून चिरोटे, कोथींबीरीच्या वड्या, कुळीथाच पिठलं असं बरंच काय काय करायचं होतं त्यांना. आल्या आल्या लेकीने आपली फर्माईश सुधाताईना दिली होती. शिवाय त्यांच्या हातचे डिंकाचे लाडू जावयाला आवडतात, हे लक्षात ठेवून त्याच्याही सामानाची यादी सुधाताईंनी करून घेतली. हो ! बघता-बघता ७-८ दिवस जातील, की जावई येतीलच अनुष्काला घ्यायला, पुढच्या विकेंडला! त्या आठवड्यात काय करू नि काय नको असं त्यांना झालं.

त्यांनी झटपट आटोपलं आणि निघाल्या. तसं दुकान (Shop) जवळच होतं .नेहमीच पायीच जात त्या! तेवढ्च चालणे पण होईल म्हणून त्या निघाल्या.” दीपकवाला” एवढा परिचयाचा, की तो घरपोच किराणा पोहोचवायचा पण! खरतर आजकाल तो व्हाट्सअप वर पण यादी मागत असे. मात्र प्रत्येक वस्तू हातात घेऊन उलटीपालटी करून, एक्सपायरी (Expiry) डेट बघून वगैरे घेण्याचा सुधाताईंचा स्वभाव . त्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.

नुकताच महिन्याचा किराणा नेला होता. तरी एवढी लिस्ट त्यांच्या हातात बघून मणिलाल ने ताबडतोब ओळखलं. “काय काकू, ताई आल्यात वाटतं? कशा आहेत त्या? बुवा पण आले का? एक मात्र खरं काकू .बुवा आपले एकदम देव माणूस बर का! ताईंनी नशीब काढलं.” अशा गप्पा करता करता त्यांनी सामान गोळा केले सुध्दा! सुधाताईंनी बिलाचे पैसे दिले. तेवढ्यात मणिलालने आठवण केली,

“ताईंसाठी गुड डे आणि ओरिओ चे बिस्कीट पुडे नाही घेतले ? त्यांना आवडतात ना ! “

“हो ! खरच की ! मी विसरले होते.” असं म्हणून सुधाताई पैसे काढू लागल्या. तोवर मणीलालनी बिस्कीट (Biscuits) पुडे पिशवीत टाकले.

आणि म्हणाला, “राहू द्या काकू. माझ्याकडून ताईसाठी! एवढ्याशा होत्या तेव्हापासून ही बिस्किटे आवडतात त्यांना !”

सुधाताईंच मन भरून आलं. अशा दुकानांमधून अशी माणुसकी जपली जाते. कितीही दूर जावं लागलं तरी त्या पूर्वीपासून ज्या दुकानातून वस्तू घ्यायच्या, तिथूनच अजूनही घेतात. अनेक वर्षांपासून, कुठे काय चांगलं मिळतं हे त्यांना माहिती आहे आणि गावाच्या कानाकोपऱ्यात पायी जाऊन त्या वस्तू घेतात. त्यांनी चेहऱ्यावरचा घाम पुसला. ओझं फारसं तसं त्यांच्याकडे नव्हतं. मणीलाल ने सामान घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. पण एक दीड वाजला होता.

बाजूनेच उभ्या असलेल्या झगमगीत मॉल कडे त्यांचं लक्ष गेलं. जत्राच भरली होती तिथे. मल्टिप्लेक्सचां सकाळचा शो संपला होता व दुसरा सुरू होणार होता. आलेले व परत जाणारे सगळेच इथेच खाण्याच्या उद्देशाने आले होते.

हाय फ्रेंड्स ! खरच आपली संस्कृती, आता “मॉल संस्कृती (Mall life) “झाली आहे असेच म्हणता येईल ना? आपले आचार, विचार, विहार, खाण, पिणं, अलंकृत होणं, वेशभूषा सगळंच काही!

मला आठवतंय, औरंगाबादला जेव्हा काही वर्षांपूर्वी (आशियातील तिसऱ्या नंबरचा असं म्हणतात) प्रोझोन मॉल सुरू झाला. तिथे गेल्यावर तेथील वातावरणाशी एकरूप व्हायलाच मला दोन-चार वेळा तिथे जावं लागलं. तिथे पहिल्यांदा जाऊन आल्यावर मी जेव्हा फक्त 43 रुपयांची खरेदी करून बाहेर आले, तेव्हा माझे हॉस्पिटल मधले सहकारी माझा ‘सत्कारच ‘करणार होते. इतकी मी त्यांना ‘अजब बाई ‘वाटले. प्रोझोनला जाऊन त्रेचाळीस रुपये खर्च केले फक्त ? आश्चर्य त्यांच्या डोळ्यात मावत नव्हतं.

त्यामानाने ‘बिग बाजार’ (Big Bazar)मात्र मला तसा खुप आपल्यातला, जवळचा वाटला ! सर्वसामान्य मध्यमवर्ग तेथे आरामात फिरत होता .थोडक्यात तो सर्वसामान्यांच्या आवाक्यातला असा वाटत होता.

नव्वदीच्या उत्तरार्धात, क्रॉसरोडस हे मुंबईतील अर्थात देशातील पहिलं बहुमजली मॉल सुरू झालं .येथील चकचकीत दुकाने, ब्रँड, मॅकडोनाल्ड फूड जॉईंट, एंट्रीलाच अचाट व गमतीशीर खेळ, यामुळे तेथे बघ्यांची गर्दी होऊ लागली. आपोआपच तिथे एन्ट्री फी लावावी लागेली. हळूहळू लवकरच हे रोप बहरत जाऊन आता जागोजागी, पावलापावलावर मॉल्स उभे आहेत. मॉल मध्ये येणारे आता ग्राहक म्हणून येतच नाहीत. ते चक्कर टाकायला, विंडो शॉपिंगला, येतात त्यामुळे मॉलवाले त्यांची विशेष काळजी घेतात .लक्षवेधी होण्याचा प्रयत्न करतात.

1991– 92 च्या दशकात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात होऊन मध्यमवर्ग जागा झाला. माध्यमांमध्ये क्रांती झाली. माहिती, करमणूक, तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित सर्व उद्योग, सर्विस सेंटर उदयाला आले. मोबाईलच्या नव्या आवृत्त्या दररोज येऊ लागल्या. आणि गाड्यांची विविध मॉडेल्स दिसू लागली. कॉल सेंटर सुरू झाली. लोक फार मोठ्या प्रमाणात परदेशात जायला यायला लागले. परदेशी लाईफस्टाईल अंगवळणी पडू लागली. आपोआपच मॉलमधील खरेदी गरजेची वाटायला लागली आणि सवयीचा भाग बनली.

शहरातून धक्के खात प्रवास तर दररोजच होतो ,त्यामुळे गर्दी नकोनकोशी वाटते. नातेवाईकांकडे जाणे, येणे हेही जड वाटायला लागते. इतर छोट्या-छोट्या खरेदीसाठी सर्व कुटुंबीयांना जाणे अशक्य असते. मग विकेंडला एकत्रित खरेदीचा आनंद लुटायचा तर असं आनंददायी ठिकाण म्हणजे मॉल! मग शनिवार, रविवार फॅमिली सकट फिरायला जाण्याचे एन्जॉय करण्याचे ठिकाण मॉल हे ठरून गेले. खाणे, खरेदी, मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, भटकणे आणि परत काहीतरी खाणे की परत सोमवार पासून जो तो आपापल्या कामाला ! हे कल्चर बनले.

पूर्वीची ग्राहकांची टेंडन्सी होती ती योग्य दर, अस्सल वस्तू( म्हणजे गॅरेंटी चा माल) वगैरे, एकच दर्जा अशा पूर्वी ऍड्स केल्या जायच्या. आजच्या जनरेशन चे खरेदीचे क्रायटेरिया ब्रँड, स्टाईल, व्हरायटी असे आहेत.

आज अनेक यूट्यूब चैनल वर स्वतःला प्रेझेंट कसं करायचं ? उंच दिसायचं असेल तर काय? पोट सुटले असेल तर कुठले कपडे घालायचे? अशा टिप्स दिल्या जातात. त्यातच एका” लूक” मध्ये काय काय घातलं ? काय छान दिसत ? आणि हे सगळं कुठून मागवले ? कुठे अवेलेबल आहे?त्यांच्या links. हे सगळं एका क्लिकवर उपलब्ध असत. थोडक्यात आज प्रत्येक व्यक्ती, विशेषतः असे तरुण तरुणी यासाठी खूप वेळ घालवत आहेत का? एवढं करून ब्रँडचे कपडे वापरणे किंवा न वापरणे यावरूनच त्यांची ग्रुपमध्ये किंमत केली जाते का? ही बाब, ज्यांना ते शक्य नाही त्यांच्या मनात त्यामुळे ‘न्यून किंवा कमीपणाची भावना’ निर्माण करते का? कॉलेजेसमधून, ट्युशन क्लासेस मधून अनेक विद्यार्थी आज असे आहेत की ज्यांना राहणे, खाणे, पिणे एवढ्यासाठी सुद्धा पैशाची मारामार करावी लागते. त्यांनी मनाला आवर कसा घालावा ?

त्यांची वये पण हुरळून जाण्याची असतात न झगमगाटाला ?
पण एक मात्र खरं की या सगळ्या मॉल ना एक कोरा करकरीतपणाचा गंध आहे. तो “रुक्ष” वाटतो. परंतु सुधाताई खरेदी करतात तसा “दिपकच्या “(आपल्या जवळचे कुठलेही किराणा स्टोअर. नाव नाम मात्र) दुकानात मात्र “आपुलकीचा ओलावा “आहे.

जरी तिथे गुळावर थोड्या माशा बसत असतील, वस्तू कदाचित कागदाच्या पुडीत बांधून दोऱ्याने बांधल्या जात असतील, किंवा डाळी, पोहे, साबुदाणा उघड्यावर मांडलेले असतील, तरीदेखील !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

ही बातमी पण वाचा : “खरेदी-एक उत्सव”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER