महासभेने शुल्क वाढीसह सवलतीचे प्रस्ताव फेटाळले

कोल्हापूर :  पाणी पट्टीसह नाट्यगृह, कलादालनात दर, दाखवा, फायर फायटर, रुग्णवाहिका, शववाहिका आदिंचे शुल्क वाढ करण्याचे प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेने फेटाळले. तसेच पाणीपट्टी, घरफाळा, गाळे भाड्यात सवलतीचे प्रस्ताव फेटाळण्यात आला. महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा झाली.

महाराष्ट्रात एनआरसी लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शहर पाणी पुरवठा विभागाने १ एप्रिल २०२० पासून पाणी पट्टी दरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला होता. तिथून तो सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला. या प्रस्तावास सभागृहाने कडाडून विरोध केला. नागरिकांना आधी नियमित योग्य पाणी द्या, नंतर बील वाढ करा असे सांगून प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले. पाणी गळती, पाण्याची चोरी, अनधिकृत कनेक्शन याबाबत प्रशासनाने काय केले, असे राजसिंह शेळके यांनी विचारले. तर अजित ठाणेकर यांनी, आतापर्यत किती बेकायदेशीर पाणी कनेक्शनवर कारवाई केली अशी विचारणा केली. तर रूपाराणी निकम यांनी पाणी वितरणातील अनागोंदी कारभारावर जोरदार टिका केली. पूजा नाईकनवरे यांनी, शाहुपुरीत पाण्याची टाकी बांधून पाच वर्ष झाली तरी त्या टाकीत पाणी पडलेले नाही हे निदर्शनास आणून दिले. पाणी पुरवठा विभाग फ्रॉड असल्याचा आरोप शेळके यांनी केला.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, पेंढारकर कलादालन, राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान दरपत्रकातील सुधारणाही नाकारण्यात आली. परवाना विभागाकडील फी दर, अग्निशमन कडील फायर फायटर, रुग्णवाहिका, शववाहिका यांचे भाडेवाड, विविध ना हरकत दाखल्याचे शुल्क वाढ असे दरवाढीचे प्रस्ताव नाकारण्यात आले.