स्वत:चे पसंतीचे नाव निवडणे व बदलणे हा मुलभूत हक्क

विद्यार्थ्याचे नाव बदलण्याचा विद्यापीठास आदेश

Delhi High Court

नवी दिल्ली : स्वत:साठी पसंतीचे नाव निवडणे व त्यात हवा तसा बदल करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे सरकार किंवा सरकारी संस्था नागरिकाचा हा हक्क नाकारला जाईल अशा नियमांची आडकाठी आणू शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

गेल्या काही महिन्यांत केरळ पाठोपाठ आता दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) असा निकाल दिला आहे. शिक्षण मंडळे आणि विद्यापीठे ज्याचे पालन करणे अशक्यप्राय आहे, असे नियम करून नाव बदलण्याच्या बाबतीत त्रास देतात त्या अनुषंगाने हा निकाल दिला गेला आहे.

न्यायालयाने म्हटले की, नाव ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. तिच ओळख घेऊन तो समाजापुढ जात असतो. त्यामुळे आपले नाव काय असावे हा त्या व्यक्तीच्या खासगीपणाच्या आणि आपल्याला हवे तसे जीवन जगण्याच्या मूलभूत हक्काचाच अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सरकार त्यावर अवाजवी निर्बंध घालू शकत नाही.

न्यायालयात ज्या विद्यार्थ्याने याचिका केली होती तो दिल्ली विद्यापीठात बी.ए.च्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे. पटत नाही म्हणून त्याचे आई-वडील गेली कित्येक वर्षे वेगळे राहात आहेत. त्याचे लहानपणापासून संगोपन आईकडील आजोळीच झाले. त्यामुळे सज्ञान झाल्यावर या मुलाने आपण वडिलांचे नव्हे तर आईचे माहेरचे आडनाव लावण्याचे ठरविले. त्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रियांची प्रक्रिया पूर्ण केली. तोपर्यंत तो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्या परिक्षांच्या गुणपत्रकांवर व प्रमाणपत्रांवर त्याचे नाव वडिलांच्या आडनावानेच लागले होते. त्याच नावाने त्याने विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

त्याने नाव बदलण्यासाठी अर्ज केल्यावर विद्यापीठाने नियमावर बोट ठेवले. आधी परीक्षा घेतलेल्या परीक्षा मंडळांनी नाव बदलल्याखेरीज विद्यापीठ नाव बदलणार नाही, असा तो नियम होता. न्यायालयाने म्हटले की, हा नियम अशक्य कोटीतील गोष्ट करायला सांगणारा आहे. कारण हा विद्यार्थी आता जरी मंडळाकडे नाव बदलन घेण्यासाठी गेला तरी मंडळ तसे करू शकणार नाही. कारण असे पूर्वलक्षी प्रभावाने नाव बदलण्याचा अधिकार मंडळास नाही. त्यामुळे विद्यापीठाचा हा नियम या विद्यार्थ्याच्या मुलभूत हक्काचा अवाजवी संकोच करणारा आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER