
लग्नानंतर आयुष्य बदलतं हे जितके खरे आहे त्यापेक्षाही कैकपटीने आयुष्य बदलते ते आई झाल्यानंतर हा अनुभव सध्या अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) पुरेपूर घेत आहे. आई होण्याची चाहूल लागल्यापासून ते या काळात तिला लागलेले वेगवेगळे डोहाळे याचे फोटोसेशन आणि ओटी भरण्याचे फोटो शेअर करत आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा काळ धनश्री काडगावकर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला. ती आई होणार हे सांगण्यापासून ते ती आई झाली इथपर्यंतच्या प्रत्येक काळात मी खूप मजा केली पण आता माझी खरी परीक्षा आहे. आईपण निभावणे आहे किती जबाबदारीचं काम आहे हे मला आता कळतंय. मी त्या नऊ महिन्यात खूप मजा केली. आत आई होण्याचा आनंद ही तितक्याच मस्तपणे घेत आहे असं सांगत धनश्रीने चाहत्यांशी संवाद साधला आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा घराघरात लोकप्रिय करणारी अभिनेत्री धनश्री काडगावकरला मुलगा झाला ही बातमी आता तिच्या चाहत्यांनीपर्यंत कधीच पोहोचली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एक्झिट होऊन जवळपास वर्ष उलटलं तरी धनश्रीची लोकप्रियता काही कमी झाली नव्हती. गेल्यावर्षी धनश्रीला ती आई होणार असल्याची चाहूल लागली आणि त्यानंतर तिने आपल्या हातातली सगळी कामं, सगळे प्रोजेक्ट थांबवले. पूर्णपणे ती तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त होती. तिचे अनेक फोटो चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात तिच्या हातात अर्थातच सोशल मीडिया हे माध्यम होतं. त्यामुळे धनश्रीच्या चाहत्यांनी तिच्या आयुष्यातील नऊ महिन्यांचा तो सुखद काळ तिने पोस्ट केलेल्या फोटोंमधून आणि वेगवेगळ्या किस्स्यांमधून पाहिला. लॉकडाउन काळात धनश्रीने तिच्या घरात बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीही तिच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करत होती. सोशल मीडियावरूनच तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. गेल्याच महिन्यात धनश्रीला मुलगा झाला आणि ती त्याच्या संगोपनात व्यस्त झाली. अर्थातच गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियापासून लांब होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच तिने आता मजा संपली परीक्षा सुरू अशी कॅप्शन देत तिच्या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो शेअर केला.
धनश्रीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ती सांगते , प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होण्याची चाहूल लागणं आणि त्या नंतरचे नऊ महिने हा खूप मस्त अनुभव असतो. माझ्या आयुष्यामध्ये हे नऊ महिने असाच अनुभव देणारे होते. या काळात मी सगळ्यांकडून खूप लाड करून घेतले. एकीकडे मी माझ्या पोटातील बाळाचा स्पर्श अनुभवत होते आणि दुसरीकडे कधी एकदा मी आई होते असं मला वाटत होतं.जेव्हा माझ्या बाळाचा जन्म झाला आणि मी आई झाले तेव्हाचा आनंद हा सगळ्या स्त्रियांसाठी असतो तितकाच माझ्यासाठीही मोठा होता. आता मला आईपणाचा आनंद तर झाला आहेच पण त्याहीपेक्षा एक जबाबदारी वाटत आहे. एरवी मी एकदा का झोपले की काही केल्या उठत नाही पण आता असं होतं की माझ्या बाळाची थोडीशी जरी हालचाल झाली तरी रात्री मला जाग येते. त्याही पुढे जाऊन असं सांगेन की मी निर्धास्तपणे झोपू शकत नाही. त्याचा प्रत्येक श्वास हा मला जाणवतो. घरात सगळे असले तरी बाळ उठल्यानंतर त्याला घेण्यासाठी, त्याला काय हवं नको हे बघण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते . अर्थात या सगळ्या काळात सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारी मी आता काहीशी या माध्यमात पासून लांब गेले आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे, कारण मला जास्तीत जास्त वेळ माझ्या बाळाला द्यायचा आहे.
गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेतून धनश्री काडगावकर हिची छोट्या पडद्यावरील पडद्यावर एन्ट्री झाली. पण धनश्रीला खरी ओळख मिळवून दिली ती तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वहिनीसाहेब या व्यक्तिरेखेने. या मालिकेचे ऑडिशन सुरू असताना धनश्रीला या व्यक्तिरेखेसंदर्भात फोन आला. सधन शेतकरी घराण्यातील एक करारी आणि हुकुमत गाजवणारी महिला कशा पद्धतीने बोलेल असा एखादा संवाद म्हणून तो ऑडीशन म्हणून पाठवावा असे धनश्रीला सांगण्यात आलं. त्यासाठी धनश्रीने स्वतः एक संवाद लिहिला आणि तो शूट करून पाठवला. तिची संवादफेक आणि वहिनीसाहेब या भूमिकेसाठी आवश्यक असणारी देहबोली यावरून धनश्रीची या मालिकेसाठी निवड झाली. या व्यक्तिरेखेने धनश्रीच्या लोकप्रियतेमध्ये भर घातली. सध्या मात्र धनश्री तिच्या बाळाच्या संगोपनात रंगून गेली आहे. सध्या धनश्रीच्या घरी लगबग सुरू आहे ती बाळाच्या बारशाची. त्यामुळे लवकरच धनश्रीच्या बाळाच्या बारशाचे फोटो सोशल मीडिया वरून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतीलच. तूर्तास धनश्री आई होण्याचा आनंद पुरेपूर घेत आहे आणि तो आनंद तिच्या चेहर्यावर दिसत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला