माकडाच्या पिल्लाची आणि हरिणाच्या पाडसाची मैत्री

... the friendship of a monkey cub and a deer padsa

नागपूर : नागपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रातील माकडाच्या पिल्लाची आणि हरिणाच्या पाडसाची मैत्री केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. माकडाचे पिल्लू आणि हरिणाचे पाडस, दोघेही त्यांच्या आईपासून दुरावलेले आहेत.

माकडाचे पिल्लू या केंद्रात आधी आले. लॉकडाऊनच्या काळात हिंगणा परिसरात लोकांनी केलेल्या दगडफेकीत या पिल्लाची आई जखमी झाली होती. तिला उपचारासाठी केंद्रात आणले होते. ती बरी झाल्यानंतर तिला वन विभागाने वनात सोडले. पण ती पिल्लाला सोडून गेली. पिल्लू वन्यजीव उपचार केंद्रात एकटे राहिले. एकटेपणामुळे ते उदास राहायचे. दिवसभर एखाद्या ‘सॉफ्ट टॉय’ला आई समजून बिलगून राहायचे किंवा उपचार केंद्रातील काही निवडक कर्मचाऱ्यांना बिलगून राहायचे.

काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात आईपासून दुरावलेले एक पाडस सापडले. वन विभागाने त्या पाडसालाही या केंद्रात आणले. आईंपासून दुरावलेल्या या दोन पिल्लांची चांगली मैत्री झाली. विशेष म्हणजे हरिणाचे पाडस येण्याआधी उदास राहणारे माकडाचे पिल्लू एकदम सक्रिय झाले. पाडसासोबत पळापळ करू लागले.

दोघेही एकमेकांपासून दूर जात नाहीत. माकडाचे पिल्लू स्वावलंबी झाल्यावर त्याला जंगलात सोडायचे असे वन विभागाने ठरवले आहे. त्यासाठी वन खात्याचे कर्मचारी माकडाच्या पिल्लाला मोबाईलवर त्याच्या आईचा आणि जंगलातील माकडांच्या टोळीचे व्हिडीओ दाखवून त्याला जंगलाची आणि माकडांच्या जीवनशैलीची ओळख करून देत आहेत. पिल्लू फक्त मोबाईलमधील चित्र पाहात नाही तर त्या चित्रांना प्रतिसादही देते, असे केंद्रातील कर्मचारी सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER