फ्रेंच क्रांतीमुळं डाव्या आणि उजव्या विचारसरणीची रेख आखली गेली !

Maharashtra Today

आजच्या राजकारणात ‘डावे आणि उजवे’ (Left and right )या विचारणीबद्दल भरपुर बोललं जातंय. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसम, केरळ आणि पॉंडेचेरीच्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने या दोन्ही राजकिय विचारधारेबद्दल भरभरून चर्चा होते. केरळमध्ये डावे आजही सत्तेत आहे तर पश्चिम बंगाल कधीकाळी डाव्यांचा गड मानला जायचा. नेमकं डावं आणि उजवं या संकल्पना आल्या कुठुन याचा विचार केला तर फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतची (French Revolution ) इतिहासाची पानं मागं पलटवावी लागतात.

सामान्य नागरिकांचा विद्रोह

उजव्या आणि डाव्या या राजकिय विचारधारेची सुरुवात फ्रेंच राज्यक्रांती वेळी झाल्याचं बोललं जातं. वर्ष होतं १७८९. जेव्हा जगानं फ्रान्सचा सत्ताबदल पाहिला. याच वर्षी १७ जुलैला फ्रान्समध्ये औपचारिकरित्या क्रांतीला सुरुवात झाली. आपआपल्या मागण्या पुढं ठेऊन त्यांनी फ्रान्सच्या राज्यासोबत बैठकीच आयोजन केलं. या सभेतल्या लोकांना राजाला सल्ला द्यायचा होता. या लोकांना ‘जनरल इस्टेट’ म्हणलं जायचं. यामध्ये तीन वर्ग प्रतिनिधित्व करत होते. यात धर्मोपदेशक, सरंजामदार आणि सामान्य जनता असे तीन प्रकारचे लोक होते.

सभा बोलण्याचा अधिकार राजाला होता. सभा बोलवायची की नाही हा पुर्ण अधिकार राजाचा असायचा. याआधी १६१४ साली अशी सभा बोलवण्यात आली होती. शेकडोवर्षे उलटुन गेल्यानंतर ही सभा होणार होती. तिथल्या नागरिकांना हे देखिल माहिती नव्हतं की हीसभा बोलावण्याची नेमकी प्रक्रिया काय?

फ्रान्सची परिस्थीती वाईट झाली होती. अत्यंत दारिद्र्यात जगणं लोकांना भाग पडलं होतं. लोकांमध्ये असंतोष वाढीस लागला. या संकटाला बघून १७८९च्या मे- जुनमध्ये तत्काीलन सम्राट सोळावा लुई यानं ही बैठक बोलावली. राजानं बोलवलेल्या बैठकीत ‘थर्ट इस्टेट’ म्हणजे सामान्य जनतेनं महत्त्वाच्या मागण्या राजा समोर ठेवल्या. त्यांच्या मागण्यांना बाकीच्या दोन इस्टेट्सनी नकार दिला. राजानं देखील मागण्या मान्य करायला नकार दिला. थर्ड स्टेटच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी होती ‘संविधान निर्माणाची.’

थर्ड स्टेट म्हणजे सामान्य लोकांच्या मागण्या नामंजूर करण्यात आल्या. थोड्या कालावधीनंतर ही सभा पुन्हा आयोजित करण्यात आली. थर्ड इस्टेटच्या लोकांना या सभेत प्रवेश नाकारला होता. त्यांनी सभेत येऊ नये म्हणून सभागृहाला कुलपं घालण्यात आली होती.

सोबत लढण्याचा केला प्रण

थर्ट इस्टेटसाठी ही बाब धक्कादायक होती. त्यांनी या गोष्टीचा विरोध करायचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी राज महालाला घेराव घातला. राजाच्या टेनिस कोर्टात सारे जमले. इथ एकूण ५७६ लोकं जमली होती. त्यांनी एकत्र मिळून ही शपथ घेतली की सोबत राहून लढा द्यायचा आणि जिंकायचा. जो पर्यंत मुलभूत अधिकार आणि संविधानाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवायचं अशी शपथ त्यांनी घेतली.

‘टेनिस कोर्ट ओथ’ या नावानं ही शपथ प्रसिद्ध आहे. या दरम्यान अनेक सरंजामदार आणि धर्मोपदेशकांनी सामान्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. राज्या आणि त्यांच्या समर्थकांना या मागणीसाठी झुकावं लागलं. त्यांनी ९ जुलैला ‘संविधानिक सभा’साठी काम करायला सुरुवात केली. दोन वर्ष संविधान सभेनं काम करुन ९ जुलै १७९१ साली संविधान सादर करण्यात आलं.

डाव्या आणि उजव्या विचारसणीचा उदय

पुढची सभा संविधानानूसार होणार होती. बैठकीची पद्धत बदवलण्यात आली होती. आधी राजाच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडायची. घोड्याच्या नालेच्या आकारात लोक बसायचे. हे सारंच बदलंलं होतं. योगायोगानं अध्यक्षांच्या डाव्या बाजूला थर्ड इस्टेटचे सामान्य गरिब लोक बसू लागले तर उजव्या बाजूला सत्ताधारी वर्ग बसू लागला. परिवर्तन व्हावं या मताचे लोक डाव्या बाजूला होते; तर आहे तशी परिस्थीती रहावी म्हणून प्रयत्न करणारे उजव्या बाजूला होते. नंतर बदलत्या वेळे सोबत डावीकडं बसणाऱ्यांना ‘डावे’ आणि उजवीकडं बसणाऱ्यांना ‘उजवे’ या नावानं संबोधलं जाऊ लागलं.

फ्रान्सच्या यशस्वी संविधान निर्मिती सोबत दुसऱ्या देशातही ही मान्यता जोर धरु लागली. परिवर्तनाची भाषा बोलणाऱ्यांना डावं म्हणलं जाऊ लागलं तर डाव्यांच्या मागण्यांना विरोध करणाऱ्यांना उजवं म्हणलं जाऊ लागलं. जगभरात ही धारणा जोर धरु लागली. १८४८ साली ही व्याख्या जास्त प्रसिद्ध झाली.

जेव्हा ‘कार्ल मार्क्स’नं त्याचे विचार जगासमोर मांडले. तेव्हापासून मार्क्सच्या विचारांपासून प्रेरणा घेतलेल्या लोकांना ‘डावे’ म्हणून ओळख मिळाली. सोबतच साम्यवादाची गणना देखील डाव्या विचारांमध्ये होऊ लागली. फ्रन्सच्या राज्यक्रांतीतून निघालेली ही संकल्पना पुढं अमेरिका, इंग्लंडसह जगभरात पोहचली. डाव्या विचाराचे लोक हे पारंपारिक रित्या स्वातंत्र्य, संसद, मुक्त व्यापाराचा पक्ष उचलून धरतात तर उजवे लोक राजेशाही आणि सामंतशाहीचा पक्ष उचलून धरतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button