जगाला हेवा वाटेल अशा नव्या संसदेचे मोदींच्या हस्ते १० डिसेंबरला भूमिपूजन

the-foundation-stone-laying

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ अंतर्गत लवकरच भारताच्या नव्या संसदेचं काम सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी १० डिसेंबर रोजी या नव्या संसदेचं भूमिपूजन करणार आहेत. नव्या संसदेची निर्मिती करताना मोदी सरकारने जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याचं सांगितलं आहे. ही नवी संसद इमारत त्रिकोणी रचनेत असणार आहे. यानुसार सध्याच्या राष्ट्रपती भवन ते थेट इंडिया गेटपर्यंतच्या तीन  किलोमीटरच्या राजपथच्या दोन्ही बाजूंना या इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी संसद, सरकारी कार्यालये आणि निवासस्थानांच्या जुन्या इमारती हटवल्या जाणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.

बिर्ला म्हणाले, नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळेच विरोधकांनी कोरोनाच्या काळात हा अनावश्यक खर्च केल्याचा आरोप करत मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. हे बांधकाम सध्याच्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. २०२२ मध्येच भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या या नव्या इमारतीचा विस्तार जवळपास ६५,००० चौरसमीटर इतका असेल. याशिवाय या इमारतीचं १६,९२१ चौरसमीटर बांधकाम जमिनीखालीही होणार आहे. संसदेची नवी इमारतही तीन मजली असणार आहे. यात एक ग्राउंड फ्लोअर आणि त्यावर दोन  मजले अशी रचना असेल. ही इमारत त्रिकोणी आकारात असेल. आकाशातून पाहिल्यास ही इमारत तीन रंगांमधील किरणांप्रमाणे दिसेल. संसदेतील लोकसभा इमारतीत ९०० आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात वाढत्या सदस्यसंख्येचा विचार करून ही संख्या वाढवण्यात आली आहे. नव्या इमारतीतही एका बाकावर दोन खासदार अशीच बैठक व्यवस्था असेल. या बाकाची लांबी १२० सेंटीमीटर असेल. राज्यसभेच्या नव्या इमारतीत ४०० आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नव्या संसद भवनात एक संविधान हॉल असेल. त्यात भारताच्या लोकशाहीचा वारसा असलेल्या गोष्टींचं खुलं प्रदर्शन असेल; याशिवाय खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या, खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER