अदनान सामी, जावेद जाफरी यांच्या माजी अभिनेत्री पत्नीने एकूण केली चार लग्ने

Zeba Bakhtiar

बॉलीवूडमध्ये (Bollywood) सतत एकत्र काम करीत असल्याने अनेकदा कलाकारांमध्ये प्रेम भावना निर्माण होते आणि त्यातूनच अनेक कलाकारांनी लग्न केल्याची अनेक उदाहरणे बॉलिवुडमध्ये आहेत. मात्र यापैकी काही जणांच्या जोड्या काही काळाने विभक्त झाल्याची उदाहरणेही आहेत. मागे आम्ही तुम्हाला कलाकारांच्या लग्नाच्या मनोरंजक गोष्टी सांगितल्याच होत्या. काही कलाकारांना जीवनात मनपसंत जोडीदार मिळत नाही म्हणून त्यांना बॅचलर राहावे लागते. असे बॅचलर असलेले अनेक कलाकार आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला एक दोन नव्हे तर चार लग्ने केलेल्या एका नायिकेची गोष्ट सांगणार आहोत. विशेष म्हणजे या नायिकेने अदनान सामी (Adnan Sami) आणि जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांच्यासोबतही लग्न केले होते. परंतु त्यांच्यासोबतही फार काळ राहू शकली नव्हती.

राज कपूर (Raj Kapoor) यांनी 1981 मध्ये ‘हीना’ नावाच्या सिनेमाला सुरुवात केली होती. भारत-पाकिस्तानमधील संबंधांच्या पार्श्वभूमीवर प्रेमप्रकरणाची कथा मांडली होती. ऋषी कपूर आणि अश्विनी भावे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. मात्र पाकिस्तानी मुलीच्या भूमिकेसाठी राज कपूर एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. पाकिस्तानात राहाणाऱ्या झेबा बख्तियारचा फोटो राज कपूर यांनी पाहिला आणि त्यांनी लगेचच झेबाला हीनाच्या मुख्य भूमिकेसाठी साईन केले. पाकिस्तानमधील राजकीय नेता आणि माजी अॅटॉर्नी जनरल याह्या बख्तियार यांची झेबा ही मुलगी. मात्र सिनेमाचे शूटिंग सुरु असतानाच राज कपूर यांचे निधन झाले आणि नंतर रणधीर कपूरने दिग्दर्शन हाती घेऊन सिनेमा पूर्ण केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. झेबा बख्तियार या एका सिनेमाने एका रात्रीत स्टार झाली होती. त्यानंतर झेबाने काही सिनेमे केले पण एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे झेबाला कामे मिऴणेही बंद झाले होते.

त्यानंतर झेबा पुन्हा पाकिस्तानला परतली. पाकिस्तानला गेल्यानंतर झेबाने सलमान वालियानीसोबत पहिले लग्न केले. दोघांना एक मुलगीही झाली. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. या दोघांनी घटस्फोट घेतला. काही काळ झेबा एकटीच राहात होती. त्यानंतर झेबाची (Zeba Bakhtiar) भेट जावेद जाफरीसोबत झाली. झेबा जावेद जाफरीच्या प्रेमात पडली आणि दोघांनी 1989 मध्ये लग्न केले. मीडियात जेव्हा या दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या तेव्हा मात्र झेबाने जावेद जाफरीशी लग्न केल्याचा इन्कार केला होता. पण जावेद जाफरीने निकाहनामा दाखवल्याने झेबा खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही आणि एका वर्षातच हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 1993 मध्ये झेबाने पूर्वीचा पाकिस्तानी गायक परंतु आता भारताचा नागरिक असलेल्या अदनान सामीबरोबर लग्न केले. त्यांना एक मुलगाही झाला. त्याचे नाव अजान सामी ठेवण्यात आले होते. मात्र हे लग्नही फार काळ टिकले नाही. चार वर्षातच दोघे वेगळे झाले. मुलाचा ताबा कोणाकडे असावा यावरून दोघे न्यायालयातही गेले होते. न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे असावा असा निर्णय घेऊन अजानचा ताबा झेबाकडे दिला होता. त्यानंतर झेबाने चौथे लग्न पाकिस्तानमधील सोहेल खान लेघाडीसोबत केले. सध्या झेबा पाकिस्तानात चौथ्या पतिसोबत सुखात नांदत असून काही पाकिस्तानी शोजमध्येही ती दिसत असते. भारतात किंवा बॉलिवुडध्ये परतण्याचा तिचा आता जराही विचार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER