खाद्यभ्रमंती सुरू, आता खीळ घालू नका…

हॉटेल व्यवसाय - संपादकीय

Shailendra Paranjapeहॉटेल (Hotel) व्यवसाय सुरू झालाय खरा पण तो सुरू करताना सरकारने घातलेल्या अटी, त्यांचे पालन होते की नाही, याची खातरजमा करण्यासाठी नेमकी काय यंत्रणा असणार, हे पुरेसं स्पष्ट नाही. त्याबरोबरच मुळात  जिल्ह्यासह पुण्यात हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या सुमारे दोन लाख कामगारांपैकी ९० टक्के हे पुण्याबाहेरचे, राज्याबाहेरचेही आहेत. त्यामुळे सुरुवात होताना पंधरा ते पंचवीस टक्के व्यवसायच सुरू होऊ शकला आहे.

हॉटेल्स रेस्टॉरण्ट्स (Restaurants) सुरू झाली खरी पण सर्वात मोठा घटक असलेले बाहेरगावचे विद्यार्थी पुण्यात नसल्याने त्याचा परिणाम जाणवला. कामगारांची अनुपलब्धता, क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहक घेण्याची अट, जागेच्या भाड्याबद्दलचे प्रश्न आणि पुरेशा तयारीअभावी पुण्यातल्या १५ ते २५ टक्के हॉटेल व्यावसायिकांनी पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी व्यवसाय केला. मात्र, सुरुवात अपेक्षेप्रमाणे स्लो किंवा धीम्या गतीनं असली तरी हळूहळू व्यवसाय वाढेल. येत्या पंधरवड्यात तो काहीसा वाढेल आणि दसऱ्यापर्यंत हॉटेल्स खऱ्या अर्थानं भरलेली दिसू शकतील आणि व्यवसायचक्रही सुरू होईल, अशी आशा आहे.

पुण्यात (Pune) घरगुती मेस किंवा खानावळींचं प्रमाण खूप आहे. त्याही विद्यार्थ्यांअभावी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. पण त्यांना कामगारांची मोठ्या संख्येने गरज नसते. तसंच डायनिंग हॉल्सही सगळे सुरू झालेले नाहीत. पुण्यात चर्चेत राहणारी रूपाली, वैशाली, गुड लक, आशा डायनिंग हॉल अशी ठिकाणं पहिल्या दिवशी सुरू झालेली नव्हती. छोटे टपरीवजा हॉटेलवाल्यांनी मात्र लगोलग व्यवसाय सुरू केले आणि त्यांच्या अर्थचक्राला गती दिलेली दिसली.

हॉटेलं सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्हच आहे पण काही व्यावसायिकांनी संसर्ग झालेली पण लक्षणे नसलेली व्यक्ती ग्राहक म्हणून आल्यास आणि त्यातून हॉटेलच्या कामगारांना करोनाची लागण झाल्यास समस्या निर्माण होऊ शकेल, अशी भीती व्यक्त केलीय. करोनाचं संकट संपलेलं नाही आणि तरीही हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांनी सरकारची भेट घेऊन व्यवसाय सुरू करण्याची विनंती केली होती, हे लक्षात घ्यायला हवं.

त्यामुळे सरकारनं सारं काही करावं, ही अपेक्षा न ठेवता सामान्य जनतेनं करोनाविषयक बंधनं कसोशीनं पाळायला हवीत. हॉटेलांना घातलेल्या अटी व्यावसायिक पाळतील पण करोनासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावयाची पूर्वकाळजी अजूनही घ्यायला हवीच. त्यातही सॅनेटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हा एसएमएस तर आजही प्रत्येकानं वाचायला आणि अमलात आणायलाच हवाय. त्याबरोबरच सर्वाधिक काळजी घ्यायला हवीय ती करोना बाधितांनी, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी. तसं झालं तर हॉटेल चालकांना वाटणारी भीती निराधार ठरेल.

पुणे जिल्ह्यात आता सुमारे चाळीस हजार करोना बाधित व्यक्तींवर रुग्णालयांमधे उपचार सुरू आहेत. पुणे शहर, पिपंरी-चिंचवडसह जिल्ह्याची लोकसंख्या एक ते सव्वा कोटीपर्यंत आहे. करोनाची जनमानसातली भीती एप्रिल मे महिन्याच्या तुलनेत तितकीशी राहिलेली नसताना केवळ चाळीस हजार करोना रुग्णांवर उपचार सुरू असतील तर जीवनाच्या विविध क्षेत्रांपेक्षा टप्प्याटप्प्याने नव्हे तर सरसकटपणे मिशन बिगिन अगेन सुरू करायला काय हरकत आहे….

सरकार, स्थानिक प्रशासन आणि मुख्य म्हणजे पोलीस यांनी फँसिलिटेटरची भूमिका घ्यायला हवी. इतक्या दिवसांनंतर म्हणजे तब्बल साडेसहा महिन्यांनतर लोक थोडा मोकळा श्वास घेऊ पाहताहेत. तेव्हा त्यांना करोना भीतीतून बाहेर यायला सरकार, प्रशासनाची शक्य ती मदतच हवीय. ती नाही झाली तरी त्यांची अडवणूक किमान मिशन बिगिन अगेनमधे तरी होऊ नये. कारण मिशन बिगिन अगेन हे अर्थचक्राला गती देण्यासाठी आहे. लाल फितीच्या आणि अडवणुकीच्या कारभाराला नव्हे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER