पहिल्या “राफेल”विमानाची फ्रान्समध्ये चाचणी

The first

पॅरिस : भारतीय हवाई दलालासाठी बनवण्यात आलेले पहिले राफेल लढाऊ विमान तयार झाले असून त्याची चाचणी फ्रान्समध्ये झाली. यावेळी भारतीय वायु सेनेचे उपप्रमुख रघुनाथ नांबियार यांनी हि चाचणी घेतली. त्यांनी गुरुवारी डेसॉल्ट एविएशनच्या राफेल विमानासोबत उड्डाण केले. यादरम्यान, भारताच्या आवश्यकतेप्रमाणे विमान तयार करणे आणि त्यात शस्त्राचा समावेश करणे यासाठी डेसॉल्ट एविएशनची मदत करण्यास भारतीय वायू सेनेची एक टीम फ्रान्समध्ये उपस्थित आहे.

नांबियार हे ४ दिवसापूर्वीच पॅरिस येथे गेले आहेत. विमानाच्या क्षमतेची तपासणी करण्यासाठी त्यांनी हे परिक्षण केले. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही विमाने भारताला सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या विमानांवर भारतात आणल्यानंतर विशेष बदल केले जातील. मात्र हे बदल योग्य प्रकारे होण्यासाठी सर्वप्रथम उत्पादन झालेल्या विमानावर त्यांचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे भारताला २०२२ पर्यंत ३५ मूलभूत स्वरूपातील विमाने मिळतील.

भारताने फ्रान्सबरोबर केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारानुसार त्यात १३ प्रकारचे खास भारतासाठीचे बदल (इंडिया-स्पेसिफिक एन्हान्समेंट्स) करण्यात येणार आहेत. त्यात रडारची क्षमता वाढवणे, वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्यांसंबंधी माहिती दिसणे, टोड डेकॉय यंत्रणा, लो बँड जॅमर, रेडिओ अल्टिमीटर आणि अतिउंच वातावरणात विमान वापरता येण्याची क्षमता आदी बाबींचा समावेश आहे. या सोयी मूळ फ्रेंच विमानात नाहीत. राफेल विमानावर हे बदल कार्यान्वित करून त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यास करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ६७ महिन्यांचा कालावधी (म्हणजे एप्रिल २०२२ पर्यंतचा काळ) लागणार आहे.