अमिताभ-दीपिकाच्या ‘द इंटर्न’चा फर्स्ट लुक झाला रिलीज

Maharashtra Today

अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) दोन वर्षांपूर्वी अभिनयानंतर सिनेमाच्या व्यवसायातही उडी घेऊन ‘छपाक’ सिनेमाची निर्मिती केली होती. निर्मात्री म्हणून तिचा हा पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर दीपिकाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ‘द इंटर्न’ सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा हॉलिवूडमध्ये याच नावाने तयार झालेल्या सुपरहिट सिनेमाची अधिकृत रिमेक आहे. सिनेमाची घोषणा केली तेव्हा सिनेमात दीपिका पदुकोण आणि ऋषी कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र प्रथम कोरोना आणि नंतर ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे निधन झाल्याने सिनेमा सुरु होऊ शकला नाही. त्यानंतर ऋषी कपूर यांच्या जागी नव्या अभिनेत्याचा शोध सुरु केला. ऋषी कपूर यांच्या जागी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना घेतले जाणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला सर्वप्रथम दिली होती. आता निर्मात्री दीपिकानेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज केला असून यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. दीपिकासोबत या सिनेमाची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स इंडियाही (Warner Brothers India) करीत आहे.

वॉर्नर ब्रदर्स निर्मित नॅन्सी मेयर्स दिग्दर्शित ‘द इंटर्न’ हा हॉलिवूडपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात हॉलिवूडचा अभिनय सम्राट सुपरस्टार रॉबर्ट डी निरो आणि अॅन हॅथवे यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेमाची कथा रॉबर्ट डी निरोच्याभोवतीच फिरत असते. रॉबर्ट डी निरो निवृत्तीनंतरचे रटाळ आयुष्य जगण्याचा कंटाळा आल्याने सीनियर सिटीझन कार्यक्रमाअंतर्गत एका कंपनीत इंटर्नशिपसाठी अर्ज करतो. त्याला अॅन हॅथवेचा इंटर्न म्हणून काम करण्याची संधी मिळते. यानंतर या दोघांमध्ये नाते कसे फुलते ते अत्यंत उत्कृष्टपणे या सिनेमात दाखवण्यात आलेले आहे.

दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करीत म्हटले आहे, माझ्या सगळ्यात खास को-स्टारसोबत पुन्हा एकदा काम करण्यास मिळणे सौभाग्याचे आहे. ‘द इंटर्न’च्या भारतीय रूपांतरणात अमिताभ बच्चन यांचे स्वागत आहे. पोस्टर वर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या सावल्या दाखवण्यात आलेल्या आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन अमित आर. शर्मा करीत आहे. या सिनेमात दीपिका अमिताभ बच्चन यांच्या बॉसची भूमिका साकारताना दिसणार आहे. अमिताभ आणि दीपिकाने सहा वर्षांपूर्वी २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘पीकू’मध्ये एकत्र काम केले होते. दीपिका या सिनेमात अमिताभ बच्चन यांची मुलगी झाली होती. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूपच आवडली होती. या सिनेमात इरफान खानचीही (Irfan Khan) महत्वाची भूमिका होती. या सिनेमाचे दिग्दर्शन शूजित सरकारने (Shujit Sarkar) केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button