‘टीआरपी’ घोटाळ्यात पोलिसांनी दाखल केले पहिले आरोपपत्र-११ आरोपींनी संगनमताने गुन्हे केल्याचा दावा

TRP Scam-Mumbai Police

मुंबई: विविध टीव्ही चॅनेल्सच्या दर्शकांची आकडेवारी बनावट पद्धतीने फुगविण्याच्या ‘टीआरपी’ (Television Rating Points-TRP)  कथित घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहिले आरोपपत्र एस्प्लनेड कोर्टातील महानगर दंडाधिकार्‍यांपूढे सादर करण्यात आले.

एकूण ११ आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र सादर करण्यात आले असून अजूनही तपास अपूर्ण असल्याने नंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

ज्या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले गेले आहे त्यात व्ही. व्ही. भंडारी, बी. एन. मिस्त्री, व्ही.आर. त्रिपाठी, यू. एम. मिश्रा, आर.डी. वर्मा आणि डी. के. पातनशेट्टी (सर्व हंसा रीसर्च कंपनीचे माजी कर्मचारी), एस. एस. पातनशेट्टी (‘फक्त मराठी’ चॅनेलचे सह-प्रवर्तक), एन. एन. शर्मा (‘बॉक्स टीव्ही’चे कर्मचारी), एच. के. पाटील,  ए.बी. कोळावडे (‘मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन’चे मालक), ए. ए. चौधरी (‘क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रा. लि’चे मालक), घनश्याम सिंग (एआरजी आऊटलायर मीडिया प्रा. लि.’चे असि. व्हाईस प्रेसिडेन्ट (डिस्ट्रिब्युशन) आणि ‘महामूव्ही’चे मालक इत्यादींचा समावेश आहे.

गुन्हगारी स्वरूपाचा विश्वासघात (भादंवि कलम ४०६ व ४०९), फसवणूक (कलम ४२०), लबाडीने संपत्ती प्राप्त करणे (कलम ४६५), बनावट दस्तावेज तयार करणे (कलम ४६८), पुरावे गायब/ नष्ट करणे (कलम २०१, २०४), गुन्हेगारास आश्रय देणे (कलम २१२) आणि गुन्हेगारी कारस्थान रचणे (कलम १२०बी) या गुन्ह्यांसाठी हे आरोपपत्र आहे.

प्रेक्षक कोणते टीव्ही चॅनेल किती वेळ बघततात याची नोंद करण्यासाठी निवडक प्रेक्षकांच्या घरच्या टीव्हीला ‘बॅरोमीटर’ नावाचे एक उपकरण बसविले जाते. हे काम चाचणी सर्वेक्षणसारखे असते. संबंधित काळात हे काम ‘हंसा रीसर्च’ या कंपनीस एजन्ट म्हणून दिलेले होते.  आरोपपत्रानुसार, प्रेक्षकांच्या घरी ‘बॅरोमीटर’ बसविण्याचे काम आरोपींपैकी भंडारी, त्रिपाठी, मिश्रा, वर्मा व डी. के. पातनशेट्टी या ‘हंसा रीसर्च’चे होते. यापैकी भंडारी व मिस्त्री यांनी टीव्ही चॅनेल्सकडून बेकायदा पैसे घेऊन त्यांचे ‘टीआरपी’ बनावट पद्धतीने वाढवून दिले, असा आरोप आहे.

‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ ‘रिपब्लिक टीव्ही( इंग्रजी व हिंदी), ‘महामुव्ही’ व ‘ वॉऊ टीव्ही’ या चॅनेल्सनी अशा बेकायेदशीरपणे ‘टीआरपी’ वाढवून घेतल्याचे तपासातून निष्पन्न होत असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

अजित गोगटे 

ही बातमी पण वाचा : ‘टीआरपी’ घोटाळा आरोपत्रास ‘रिपब्लिक टीव्ही’ आव्हान देणार याचिकेच्या दुरुस्तीस हायकोर्टाची अनुमती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER