दहा चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याचा विक्रम या पिता-पुत्रांच्या नावावर आहे

Movies

बॉलिवूडमध्ये नायक म्हणून पिता पुत्रांच्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. पिता पुत्राच्या जोडीची आठवण काढल्यावर लगेचच पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांची सर्वप्रथम नावे डोळ्यासमोर येतात. पृथ्वीराज कपूर यांच्यासह राज, शम्मी आणि रणधीर ही त्यांची तीन मुले बॉलिवूडमध्ये प्रचंड यशस्वी ठरली. त्यांची पुढची पिढीही प्रचंड लोकप्रिय झाली. यानंतर अमिताभ आणि अभिषेक बच्चन, सुरेश ओबेरॉय-विवेक ओबेरॉय, ऋषी कपूर-रणबीर कपूर, धर्मेंद्र-सनी-बॉबी यांचीही नावे आठवतात. या पिता पुत्रांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. पण पिता-पुत्राच्या जोडीने सगळ्यात जास्त चित्रपट करण्याचा मान हा फक्त धर्मेंद्र-सनीकडे जातो. गेल्या 34 वर्षांत या जोडीने थोडेथोडके नव्हे तर दहा चित्रपट केले आहेत.

सनी देओलने 1984 मध्ये पिता धर्मेंद्रसोबत सर्वप्रथम काम केले ते ‘सनी’ या चित्रपटात. या चित्रपटात धर्मेंद्र आणि सनीने पिता-पुत्राचीच भूमिका साकारली होती. धर्मेंद्रने इंदरची तर सनीने सनीची भूमिका साकारली होती. पत्नी गायत्री (वहीदा रहमान) कडून प्रेम मिळत नसल्याने इंदर कोठेवाली सितारा (शर्मिला टागोर) कडे जात असतो. सिताराला इंदरपासून मुलगा तो मुलगा म्हणजेच सनी. मोठा झाल्यावर सनीचे ज्या मुलीवर प्रेम जडते ती सिताराची भाची असते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही.

या दोघांनी नंतर 1986 मध्ये ‘सल्तनत’ चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातही या दोघांनी पिता-पुत्राचीच भूमिका साकारली होती. पित्याच्या हत्येचा बदला सनी रजौली (अमरीश पुरी) नावाच्या खलनायकाला ठार मारून घेतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यशस्वी झाला होता.

1986 मध्येच आलेल्या ‘सवेरे वाली गाड़ी’ चित्रपटातही या दोघांनी एकत्र काम केले. पी. भारतीराजा दिग्दर्शित हा चित्रपट एका तामिळ चित्रपटाची रिमेक होती. या चित्रपटात मात्र या दोघांनी पिता-पुत्राची भूमिका साकारली नव्हती. धर्मेंद्रने शेरसिंगची भूमिका साकारली होती जी पाहुण्या कलाकाराची होती. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट काही चालला नव्हता.

तीन वर्षानंतर म्हणजे 1989 मध्ये दिग्दर्शक उमेश मेहराने या दोघांना ‘वर्दी’ चित्रपटात एकत्र आणले. चित्रपटात या दोघांसोबत जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षितही होते. यात सनीने इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती आणि तो आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेताना दाखवण्यात आले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता.

त्यानंतर चार वर्षानंतर 1993 मध्ये जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘क्षत्रिय’ चित्रपटात सनी आणि धर्मेंद्रने एकत्र काम केले. या चित्रपटात सुनील दत्त आणि संजय दत्त ही पिता पुत्रांची जोडीही होती. पण हा चित्रपटही चालला नव्हता.

त्यानतंर दहा वर्षांनी अनिल शर्मा यांनी 2003 मध्ये ‘कैसे कहूं के प्यार है’ मध्ये या दोघांना एकत्र आणले. चित्रपटाचा मुख्य नायक अमित हिंगोरानी होता. चित्रपटात काहीही दम नसल्याने हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता.

अनिल शर्माने ‘गदर’नंतर 2007 मध्ये ‘अपने’ चित्रपटाला सुरुवात केली. या चित्रपटात फक्त धर्मेंद्र आणि सनीच नव्हे तर बॉबी देओललाही या चित्रपटात घेतले होते. तिघांनी या चित्रपटातून प्रथमच एकत्र काम केले. बॉक्सिंगवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यशस्वी झाला होता.

यानंतर मात्र सनीने स्वतःच चित्रपट निर्माता बनत 2011 मध्ये भाऊ बॉबी आणि पिता धर्मेंद्रसोबत ‘यमला पगला दीवाना’ची निर्मिती केली. विनोदी असलेला हा चित्रपट या तिघांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

हा चित्रपट यशस्वी झाल्याने सनीने 2013 मध्ये पुन्हा ‘यमला पगला दीवाना 2’ ची निर्मिती केली. यात पुन्हा धर्मेंद्र, सनी आणि बॉबी एकत्र आले होते. ‘यमला पगला दीवाना’ यशस्वी झाला तसा हा चित्रपटही हिट होईल असे सनीला वाटले होते. परंतु ओढून ताणून आणलेले विनोद प्रेक्षकांना आवडले नाहीत त्यामुळे चित्रपट फ्लॉप झाला.

पाच वर्षानंतर म्हणजे 2018 मध्ये सनीने पुन्हा एकदा पिता धर्मेंद्र आणि भाऊ बॉबीसोबत ‘यमला पगला दीवाना फिर से’ ची निर्मिती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर थोडा फार यशस्वी झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER