राज्यातील शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची प्रतीक्षाच

School teacher - Insurance - Maharashtra today
  • करोना काळात एप्रिलपर्यंत २१३ शिक्षकांचा मृत्यू, मात्र एकालाही छदाम मदत नाही

नागपूर : कोरोनाकाळात विविध जबाबदारी पार पाडताना मृत्यू झालेल्या राज्यातील शिक्षकांची संख्या एप्रिलपर्यंत २१३ वर पोहचली आहे. मात्र यापैकी अद्याप एकाही शिक्षकाच्या वारसांना ५० लाखांची अपेक्षित सानुग्रह मदत मिळालेली नसल्याची भयानक वास्तविकता समोर आली आहे. शासनाच्या ७ डिसेंबर २०२० च्या निर्देशानुसार कोरोनासंबंधी जबाबदारी पार पाडत असताना शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा कवच लागू करण्याची शिक्षकांची मागणी मान्य करण्यात आली होती. यानंतर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील रामदास काकडे यांचे १६ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर राज्यातील पहिले प्रकरण विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरतर्फे रेटून प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. या प्रकरणात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरतर्फे पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय नागपूर यांनी मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र अद्यापही काकडे कुटुंबीयांना मदत मिळालीच नाही. तसेच यानंतर राज्यात कोविड ड्युटी अंतर्गत मृत्यू झालेल्या काही शिक्षकांचे प्रस्तावच सादर झाले नाहीत, तर काहींचे प्रस्ताव त्रुटी काढून शिक्षणाधिकारी कार्यालयाने फेटाळत आपल्या असंवेदनशील कामाचा परिचय दिला असल्याचा आरोप शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी केला आहे.

राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या २१३ शिक्षकांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची संख्या ६० – ७० च्या घरात तर प्राथमिक शिक्षकांची संख्या १३० च्या घरात आहे. कोरोनाची लागण झालेल्या कित्येक शिक्षकांना महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. मृत्युपश्चात उपचाराचे लाखो रुपये चुकवण्याची वेळ कुटुंबावर आली. राज्यातील सुहास जाधव या शिक्षकाचा ११ सप्टेंबर रोजी तर रामदास काकडे यांचा १६ सप्टेंबर रोजी कोविड सेवा करताना मृत्यू झाला. त्यात विमा मिळविण्यासाठी रामदास काकडे यांचा ६ नोव्हेंबर रोजी तर सुहास जाधव यांचा १४ ऑक्टोबर रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला. पण अद्यापही सुरुवातीला पाठविण्यात आलेल्या या दोन्ही प्रकरणांना मंजुरी मिळालेली नाही.

वारसदार नामांकनाची मोठी अडचण
सानुग्रह निधीचा प्रस्ताव सादर करताना मृत्यूचा दाखला व अन्य कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रामुख्याने अडचण वारसदार नामांकनाची असते. विवाहापूर्वी शिक्षक सेवापुस्तिकेत आईचे किंवा वडिलांचे नाव वारसदार म्हणून लावतात. विवाहानंतर कुटुंब पोषणाची जबाबदारी पत्नीवर येते. त्यामुळे तिचे नामांकन अपेक्षित असते. हा बदल वेळीच करण्यात न आल्यास मृत्यूनंतर वादाचे प्रसंग उद्भवतात. शिक्षणाधिकारी कार्यालय अशा त्रुटी निदर्शनास आणत प्रस्ताव फेटाळून लावत आहे.

जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळेतील प्राथमिक शिक्षकांना जिल्हाबंदी असताना आडवळणावर प्रवाशांची तपासणी, प्रतिबंधित क्षेत्रात राखणदारी, गावातील बाधितांचे अहवाल, सारी सर्वेक्षण, संस्थात्मक विलगीकरणावर निगराणी व तत्सम स्वरूपाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे कार्य करत असताना १३० प्राथमिक शिक्षकांचा मृत्यू झाला. यात नागपूर १०, गोंदिया ९, गडचिरोली १, यवतमाळ २, सांगली ३, कोल्हापूर ५, धुळे १४, नंदूरबार १५, जळगाव ४, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी २, औरंगाबाद १४, लातूर ११, उस्मानाबाद ७, नांदेड २२, हिंगोली १० व बीड १ शिक्षकांचा समावेश आहे.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान कर्मचारी म्हणून सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक प्रमोद माने १६ ते १७ एप्रिलपर्यंत कार्यरत होते. प्रमोद माने यांना कोरोनाची लागण झाल्याने १९ एप्रिल रोजी प्रकृती बिघडली व २५ एप्रिल रोजी निधन झाले. विशेष म्हणजे प्रमोद माने यांच्यापासून कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांतील चार व्यक्तींचे निधन झाले. विशेष म्हणजे हा व्यवस्थेचा घेतलेला बळी आहे. या नियोजनशून्य व्यवस्थेमुळे माने यांच्या कुटुंबीयांतील चार लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाकाळातील विमा संरक्षण कवच लागू असूनसुद्धा वेळेत मदत होत नसल्याने या कुटुंबीयांचे पालनपोषण कसे होईल? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हीच गत शिक्षकांसोबतच कोविड कर्तव्यावरील पोलीस, महसूल कर्मचारी, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे.

कोविड कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना तसेच पोलीस, महसूल कर्मचारी, ग्रामसेवक या कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण योजनांतर्गत तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरतर्फे शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक शेषराव खार्डे, भीमराव शिंदे मेश्राम, कुंदन भारसागडे, गणेश उघडे, धीरज यादव, प्रणाली रंगारी, रूपाली मालोदे, कैलास निघोट, दिनेश गेटमे, नंदा भोयर, राजू हारगुडे, गौरव दातीर, सतीश डहाट, प्रा. कमलेश शहारे, अरुणा चवरे, बाळकृष्ण राजूरकर, बाळकृष्ण बालपांडे (गोंदिया), मुकुंद पारधी (भंडारा) यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button