शिवभोजन योजनेचा विस्तार थाळीची संख्या दुप्पट १८ हजारांवरुन ३६ हजार

मुंबई  :- शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या इष्टाकांत (संख्येत) दुप्पट वाढ करण्यात आली असून ही संख्या १८ हजारांवरुन ३६ हजार थाळी इतकी झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय आज निर्गमित केला आहे. यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान ७५ व कमाल १५० थाळींचे उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान ७५ आणि कमाल २०० थाळी इतके वाढवता येईल.

विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत धानाची आवक वाढल्याने जिल्ह्यातील साठवणूक क्षमता वाढवावे – छगन भुजबळ

योजनेला भरघोस प्रतिसाद

राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच योजनेला राज्यातील गोरगरिब जनतेने उदंड प्रतिसाद दिला.

केंद्राची निवड पुर्वीच्याच पद्धतीने

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ जानेवारी २०२० च्या शासननिर्णयान्वये केंद्राची निवड करण्याची पद्धत निश्चित करून दिली आहे. याचपद्धतीने पुढेही केंद्राची निवड करण्याची सूचना या शासननिर्णयान्वये देण्यात आली असून केंद्राची प्रतिदिन थाळीची संख्या आता आवश्यकतेनुसार २०० च्या मर्यादेत वाढवता येईल.

शिवभोजन केंद्रांना भेट

अन्न, नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गट विकास अधिकारी तथा समकक्ष अधिकाऱ्यांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट व तपासणी आयोजित करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यावयाचे आहे.

पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार करण्याचे नियोजित आहे. आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी १४८ केंद्रावर १६ हजार २३७ लोकांनी शिवभोजन योजनेतील थाळीचा आस्वाद घेतल्याचे दिसून आले आहे.