
नवी दिल्ली : आशिया आणि युरोपीय खंडांना जोडणाऱ्या इजिप्तमधील सुएझ कालव्यातील वाहतूक कोंडीने (Suez Canal) सर्वांचे लक्ष वेधले आहे. तैवानचे ‘एव्हरगिव्हन’ (Evergiven)हे महाकाय मालवाहू जहाज वादळात भरकटल्याने सुएझ कालव्यामध्ये अडकले आहे. यामुळे दोन्ही दिशेची जलवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. युरोपात प्रवेश करण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावे लागणार आहे. यामुळे मालवाहू जहाजांना ६ हजार मैल जास्तीचे अंतर कापावे लागणार आहे. यासाठी ३ लाख डॉलर्सचा खर्च इंधनासाठी करावा लागणार.
ही घटना २३ मार्च रोजी (मंगळवारी) घडली. या जहाजावर प्रचंड कंटेनर आहेत. मंगळवारी सुएझ कालवा पार करताना आलेल्या वादळात ‘एव्हरगिव्हन’ मालवाहू जहाजाचे नियंत्रण सुटले आणि ते कालव्याच्या एका किनाऱ्याला धडकले. या जहाजाची लांबी ४०० मीटर आहे. त्यावर २ लाख टन माल आहे. जहाज किनाऱ्यालगत थांबले आहे. त्याला हलवण्याचे शर्थीचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. मात्र, मागील ५ दिवसात ३५० मालवाहू जहाजे सुएझ कालव्याच्या मार्गावर खोळंबली आहेत. या जहाजांमध्ये कच्चा माल, इंधन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, अन्नधान्य यांचा समावेश आहे. ही कोंडी फोडण्यासाठी जपानच्या कंपनीची मदत घेतली जात आहे.
सुएझ कालव्यामध्ये अडकल्यामुळे शौचालयातील पेपर, कॉफी, फर्निचर, कपडे, शूज, व्यायामाची उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, कारचे भाग आणि कार्पेटची कमतरता भासू शकते, असे लॉजिस्टिक्स तज्ज्ञांनी सांगितले. डेन्मार्कमधील स्वतंत्र कंटेनर शिपिंग तज्ञ लार्स जेन्सेन यांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, “स्टोअर्समध्ये आपण पहात असलेल्या प्रत्येक गोष्टींवर याचा परिणाम होईल”. सुएझ कालव्यातून जागातिक व्यापाराच्या १२ टक्के मालाची वाहतूक होते.
दरम्यान, युरोपात प्रवेश करण्यासाठी आता आशियातील मालवाहू जहाजांना दक्षिण आफ्रिकेवरून यावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड’ होपला वळसा मारून जहाजे आता युरोपात जातील. सुएझ कालव्याची कोंडी केव्हा फुटणार याबाबत अद्याप सुएझ कालवा ऑथॉरिटीनं सुद्धा कोणतीही डेडलाइन दिलेली नाही. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत मालाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. किमान ३ ते ४ आठवडे ही कोंडी फुटण्यासाठी लागेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
ही बातमी पण वाचा : स्वेझच्या वाहतूक कोंडीत अडकले हजारो प्राणी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला