राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपावर टीका करतो, हे महाराष्ट्र जाणतो; संजय काकडेंची टीका

sanjay kakade - sanjay raut - Maharashtra Today

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘रोखठोक’मधून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांनी टोलेबाजीही केली. या रोखठोकवर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी प्रत्युत्तर दिले.

“शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज ‘मोदी-शहा का हरले’ यावर लेख लिहिला. राऊतांनी स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण करावे, ही अपेक्षा आहे. डोळ्यावर पट्टी बांधून लिखाण केल्यामुळे राऊतांना मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये मिळवलेले यश दिसले नाही. अर्धवट माहितीवर व राजकीय अपरिक्वतेतून लिखाण संजय राऊतांनी थांबवावे.” अशी टीका खासदार संजय काकडे यांनी केली.

“वास्तविक गतवेळच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाने फक्त ३ जागा जिंकल्या. २०२१च्या निवडणुकीत भाजपाने ७७ जागेवर विजय संपादन केला. हा विजय २७०० टक्के जास्त आहे. ही आकडेवारी पाहिल्यास भाजपाने मोठे यश प्राप्त केल्याचे समजू येईल. परंतु, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या संजय राऊतांना ते कसे दिसेल? २०१४ मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष वेगळे लढले. त्यावेळी प्रत्येकाने बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्व प्रचार सभांमधून शिवसेना बहुमताने सत्तेत येणार सांगितले. परंतु, शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. २०१९ मध्ये आपण एकत्र लढलो. तरीदेखील भाजपा १०५ जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला जावा, म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते प्रचाराचा भाग म्हणून बहुमताने सत्तेत येऊ म्हणून बोलत असतात. म्हणून संजय राऊत यांनी अज्ञानातून व राजकीय अपरिक्वतेतून लिखाण केल्याचे दिसते.” असे काकडे म्हणाले.

पुढे संजय काकडे म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे असताना २५ वर्षे भाजपा-शिवसेना युती होती. युती तुटल्यावर बाळासाहेबांच्या पश्चातदेखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर ५ वर्षे भाजपा-शिवसेना सत्तेत होती. बाळासाहेब ठाकरे यांचे आणि भाजपाचे ऋणानुबंध खूप दीर्घकालीन राहिले. असे असतानादेखील भाजपाने आपला जुना मित्र आणि बाळासाहेबांबरोबरील ऋणानुबंधाची आठवण ठेवत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना आवश्यक तिथे सर्वोतोपरी मदत करण्यास तत्परता दाखवतात.”

“संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांबाबत कधी टोकाचे बोलत नाहीत. मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले की, पंतप्रधान मदत करत आहेत आणि आज संजय राऊत असा लेख लिहितात. संजय राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपाच्या नेत्यांवर टीका करतात. भाजपाचे वरिष्ठ नेते व उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढवण्याचे काम करत आहेत? खरं तर, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यांनी अभ्यास न करता, अज्ञानातून भाजप नेत्यांबाबत लिखाण करू नये.” असे प्रत्युत्तर काकडे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button