मी राज्यासाठी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती – शरद पवार

Sharad Pawar

सांगली : मला मोदी आणि शाहांच्या प्रकृतीची काळजी वाटते. झोपेतही ते शरद पवार म्हणत चवताळून उठत तर नसतील ना? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची खिल्ली उडवली. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आबा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- राष्ट्रवादीचा पुढील वारसदार लोकशाही पद्धतीनेच ठरवणार, शरद पवारांचे स्पष्टीकरण

सभेत शरद पवार यांनी भाजप सरकार व नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात पंतप्रधान येवो अथवा गृहमंत्री येवो भाषणात त्यांच्या बोलण्यात कायम एकच गोष्ट. मला त्यांची काळजी वाटते. ते दोघे झोपोतसुद्धा माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना? अशी शंका येते” अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे नाव घेतल्याशिवाय भाषण करता येत नाही. मोदींचा काही प्रश्न नाही पण दुसऱ्यांनी घेतले तर घरातले पण विचारतील. मात्र त्यांना माझे नाव घेतल्याने शांत झोप लागत असेल तर हरकत नाही. अमित शहा यांना प्रश्न विचारतो, पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होत ? फक्त गुजरातच्या लोकांना माहिती होत.आणि तेच आम्हाला येऊन विचारतात तुम्ही काय केलं. असेही पवार म्हणाले.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारू असे सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षात एक इंचही काम पुढे सरकले नाही. शिवाय महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्या गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली तिथे आता हे छमछम सुरू करणार का? असा संतप्त सवाल करत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राज्यातील किल्ले लग्न कार्यासाठी द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास आहे. एवढा बार, छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा’. महायुतीच्या सरकारने सत्तेचा वापर शेतकरी, बेरोजगार, उद्योग यांच्यासाठी केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य व अभिमानाचा इतिहास उद्ध्वस्त करण्यासाठी केला जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचा पहिलवान तेल पहिलवान तेल लावून तयार आहे. पण समोर कुस्ती खेळायला कोणी नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर आता पवार यांनी उत्तर दिलेले बघायला मिळत आहे. पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही हवे तिकडे पहिलवान उभे करु हाकतो, कारण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष मी आहे. सगळे जिल्हे, सगळ्या कुस्ती संघटनांचा अध्यक्ष मी आहे. मी राजकारणाबाहेर खेळाच्या क्षेत्रातही काम केले. मी मुंबई, महाराष्ट्र आणि जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मला अनेक खेळाडू तयार करण्यात रस आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका. आम्ही हवे तितके लोक तयार केलेत असेही ते म्हणाले.

राज्य भाजपच्या हातात आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. तुमच्याकडे प्रपंच दिला आणि तुम्ही आम्हाला विचारताय आम्ही काय केलं ? फडणवीस साहेब हे वागणं बरं नवं, जरा नीट वागलं पाहिजे. आम्ही काय केलं हे महाराष्ट्राला माहीती आहे. दरम्यान, ज्यांनी पक्ष बदलले त्यांच्या विरोधात यावेळी जनता आहे. पक्ष बदलणारे स्वत:च्या स्वार्थासाठी दुसरीकडे गेले असून त्यांना जनता नक्की धडा शिकवणार आहे. असा इशाराही त्यांनी दिला.

तासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथे आयोजित या प्रचार सभेसाठी उमेदवार सुमनताई पाटील, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.