आळंदीतली अविरत माणुसकी…

आळंदीतली अविरत माणुसकी

Shailendra Paranjapeकरोनाचं (Corona) संकट अद्याप संपलेलं नाही, असं रोज सांगूनही आणि हात धुवा, मास्क घाला आणि सुरक्षित अंतर पाळा ही त्रिसूत्री विविध माध्यमांमधून सातत्यानं सांगितली जाऊनही पुण्यासारख्या शहरात मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांकडून नऊ दहा कोटी रुपयांचा दंड वसूल होतो, ही एकच गोष्ट शहराचा लौकिक घालवायला पुरेशी आहे.

पुणे (Pune) शहरानं करोनाच्या संकटाच्या काळात सर्वाधिक संसर्ग असलेलं शहर हा लौकिक प्राप्त करून घेतलाच होता. अर्थात, त्याबद्दल मुंबईदेखील मागं नव्हती. संपूर्ण देशात असलेल्या करोना संसर्गात महाराष्ट्रातली रुग्णसंख्या सर्वाधिक होती आणि महाराष्ट्रातलही पुण्यामुंबईचे एकूण रुग्ण महाराष्ट्राच्या इतर सर्वच भागांपेक्षा जास्ती होते.

करोनाची रुग्णसंख्या पुण्यामुंबईत जास्ती असल्याची कारणंही ही शहरं कॉस्मोपॉलिटन होणं आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणं, मूळ शहराबाहेरची लोकसंख्या तुलनेनं खूप जास्ती वाढणं अशी अनेक कारणं होती. हे सारं असूनही पुण्यामधे सर्वच समाजघटकांनी साथ दिल्यानं करोना अटोक्यात आलाय. दिवाळीच्या खरेदीला गर्दी केल्यानं ते रुग्ण आता दिसू लागतील, ही भीतीही निराधार ठरू लागलीय. दैनंदिन रुग्णसंख्या सतत वाढती राहिलेली नाही, ही समाधानाची बाब आहे.

पुण्यानं करोना काळात मिळवलेला बदलैकिक घालवणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा शहरानं आपला नावलौकिक अभिमान वाटेल, असा करणंही गरजेचं आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सारेच दैनंदिन व्यवहार पूर्ववत होत चालले आहेत. अर्थचक्रालाही गती मिळतेय. पण हे सारं होताना समाजातल्या गोरगरीबांना करोनाच्या परिणामस्वरूप लादल्या गेलेल्या मंदीतून सुटका मिळालेली नाही. हातावरचं पोट असलेल्यांच्या अर्थचक्राचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे पुण्याचा लौकिक पुन्हा मिळवण्याची भाषा करत असतानाच माणुसकीला काळिमा लावतील, अशा घटनाही घडताना दिसत आहेत. अगदी मानवी नातेसंबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे प्रसंग घडत आहेत.

असाच एक प्रसंग आळंदीमधल्या जागरूक सामाजिक कार्यक्रत्यांमुळे उघडकीस आलाय. हा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. आईचं काळीज कापून हातात घेऊन जाणाऱ्या मुलाला ठेच लागल्यानंतर ते काळीजच त्याची विचारपूस करतं, ही लहानपणी ऐकलेली गोष्ट पुन्हा आठवली. ती आठवण्याचं कारण आळंदीत घडलेल्या काळीज हेलावून टाकणाऱ्या घटनेची बातमी.

पुण्याजवळच्या एका छोट्या गावातले दोन भाऊ आपल्या वृद्ध आईवडिलांना घेऊन आळंदीला गेले. आईवडिलांना भीक मागण्यासाठी आळंदीला सोडून द्यायचं, असा त्यांचा डाव होता. पण आळंदी देवस्थानबाहेर प्रसाद विक्रीचे दुकान चालवणाऱ्या प्रसाद मेनकुदळे यांनी त्याबद्दल संशय आल्यानं सामाजिक काम करणाऱ्या मित्राला फोन करून बोलावून घेतले आणि हा डाव उधळून लावला. अविरत फाऊंडेशन या सामाजिक काम करणाऱ्या आळंदीतल्या संस्थेचे अध्यक्ष निस्सार सैय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी केल्यावर सुरुवातीला या दोघा भावांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलीस स्टेशनला चला, असं सांगितल्यावर मात्र गयावया केली आणि आपण आईवडिलांना भीक मागण्यासाठी आळंदीत सोडून जाणार होतो. पण आता परत घरी घेऊन जातो, अशी हमी दिली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणीच्या गोष्टीसारखंच या घटनेतल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना पोलिसांकडे नेलं तर आम्ही जीव देऊ, अशी धमकी दिली. त्यांना भीक मागायला सोडून जाऊ पाहणाऱ्या मुलांसाठी जीव द्यायची तयारी या माता-पित्यांनी दाखवली. पण मुलं मात्र त्यांना सोडून चालली होती.

आळंदीला कार्तिकी वारी आहे. वारी करून न मिळणारं पुण्य अविरत फाऊंडेशनचे निसार सैय्यद, केदारेश्वर जाधव, सागर मेनकुदळे, ज्ञानेश्वर स्वामी, प्रतीक आकोटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळवले आहे. त्यांचा उचित गौरव व्हायला हवा आणि आईवडिलांना सोडून जाऊ इच्छिणाऱ्या त्या दोघा भावांना भेटून त्यांचं समुपदेशन करून त्यांना पुन्हा अशी इच्छा होणार नाही, हेही बघायला हवं.

माऊलींच्या आळंदीत नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांनी करोना आला किंवा अन्य कोणतीही संकटं आली तरी माणुसकी अविरतपणे जिवंतच राहील, याची ग्वाही दिलीय. त्यांचं अभिनंदन.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER