भाजपमधील खडसेपर्वाची अखेर : पुढे काय होणार?

Eknath Khadse

गेली चाळीस वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर काम केलेले, मंत्री; विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपमधील (BJP) एक पर्व संपले. एका असंतुष्ट नेत्यांला पक्ष सोडावा लागला. या पक्षांतराची आता काही दिवस कारणीमीमांसा होत राहील. कोण चुकले यावर टीकाटिप्पणी होत राहील पण एक खरे की भाजपने एक बडा नेता गमावला.

कोणी म्हणेल की खडसेंना भाजपने काय काय नाही दिले? त्यांना मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद, त्यांच्या सुनेला दोनवेळा खासदारकी, मुलाला आणि मुलीला एकेकदा आमदारकीची उमेदवारी, मुलीला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असे सगळे एका कुटुंबात दिले. तरीही खडसेंनी पक्ष सोडला. दुसरीकडे असेही म्हटले जाईल की त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलले गेले, विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. मंत्रिमंडळातून त्यांना अपमानित पद्धतीने जावे लागले. एका ज्येष्ठ नेत्यावर असा अन्याय होणे योग्य आहे का असा दुसरा तर्कही दिला जात आहेच.

खडसेंनी चाळीस वर्षे पक्षात घालविली तशीच हयात पक्षात घालविणारे अनेक लोक आहेत. ते आयुष्यभर पक्षात सतरंजीच उचलत राहिले आणि चिवडा खाऊन, पाणी पिऊन पक्षाचा प्रचार करीत राहिले. अन्यायाची भावना त्यांनी कधी बोलून दाखविली नाही आणि पक्षाने मला काय दिले याचा हिशेब त्यांनी कधी विचारला नाही. वयाच्या सत्तरीत खडसेंनी मात्र नाराजीनाट्याचा अंक खेळला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला पक्ष सोडावा लागत असल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखविली. माझी पक्षाबद्दल नाराजी नाही, मोदी-शहांबद्दल नाराजी नाही असे खडसे म्हणत आहेत. हा एक कांगावा आहे. फडणवीस यांना विरोध करताना इतर नेत्यांप्रती लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली सिम्पथी स्वत:कडे ओढून घेण्याची ही राजकीय खेळी आहे.

मीडियाचे कसे असते? आज खडसेंनी पक्ष सोडला की लगेच खडसेंनी दिला भाजपला धक्का, भाजपला हादरा असे हेडिंग चॅनेलवर सुरू होतात. जळगाव जिल्हा जो खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो तो आज खरेच त्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे का? तिकडे जाऊन बघा? बालेकिल्ला असता तर खडसेंची कन्या मुक्ताईनगर या त्यांच्या घरात विधानसभेची निवडणूक का हरली असती? आज त्या ठिकाणी गिरीश महाजन, मामा भोळे यांच्यासारखे पर्यायी नेतृत्व उभे राहिले आहे. खडसे यांच्या सूनबाई रक्षा या आश्वासक चेहरा आहेत आणि त्या भाजपमध्येच राहणार आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोेंडावर खडसेंनी भाजप सोडला असता तर मोठा धक्का बसला असता. आता पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आणखी चार वर्षे आहेत. पक्षाला जोही थोडाफार धक्का आज बसला आहे त्यातून सावरण्यासाठी आणि खडसेंना पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पुरेसा कालावधी भाजपकडे आहे.

खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरेल, हे आजच लिहून ठेवा. गुलाबराव देवकरांपासून अनेक नेते आतापासूनच सावध झाले असतील. खडसेंचे डॉमिनेटिंग नेचर त्यांना माहिती आहे. खडसेंच्या विरोधात सातत्याने राजकारण करीत आलेले शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन, मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता पुढे काय याची रणनीती आखणेही सुरू केले असेल. जळगाव महापालिका भाजपच्या हातात आहे आणि खडसे गेल्याने या सत्तास्थानाला कुठलाही धक्का बसणार नाही.खडसे हे लेवापाटील समाजाचे मोठे नेते आहेत आणि जळगाव, बाजूचा बुलडाणा, इकडे धुळे व नाशिक जिल्ह्यातील लेवा पाटील समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, खडसे राष्ट्रवादीत गेले म्हणून अख्खा समाज राष्ट्रवादीत जाईल, असे गणित कोणी मांडत असेल तर त्याला राजकारण कळत नाही असा त्याचा अर्थ आहे.

भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे हे खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात पण तेही राष्ट्रवादीत का गेले नाहीत? आपला नेता कोणीही असला तरी प्रत्येकाला स्वत:चे राजकारण असते, स्वत:चे ठोकताळे असतात आणि त्यानुसार निर्णय घ्यायचे असतात. सावकारे हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार, राज्यमंत्री होते. खडसेंचे बोट धरून ते भाजपमध्ये गेले आणि पुन्हा आमदार झाले. आता खडसेंबरोबर जाणे राजकीयदृष्ट्या सोईचे नाही हे समजत असावे म्हणूनच सावकारे थांबले असणार.

राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात खडसेंनी निष्ठेला मूठमाती देत पक्ष बदलला. एकनिष्ठ राजकारणाचा इतिहास त्यांच्या नावाने लिहिला जाणार नाही. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीला पक्षांतराचा डाग लागला याचे अधिक वाईट वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER