गुलाम झाला बादशाह आणि मुलीनं मिळवली सल्तनत! जाणून घ्या बाप-लेकीचा पराक्रमी इतिहास !!

Shams ud-Din Iltutmish - Qutubuddin Aibak - Razia Begum

अल्तमश तर्तारच्या बड्या सरदाराचा मुलगा. त्याच्या इतर भावांना अल्तमशचा प्रचंड तिरस्कार होता. अल्तमश दिसायला त्यांच्याहून देखणा आणि बु्द्धीमान होता. एकदा शिकारीला आपल्या भावंडासोबत गेलेल्या अल्तमशच्या अंगावरुन सर्व अलंकार आणि महागडे कपडे त्याच्या भावंडांनी काढून घेतले आणि त्याला एका व्यापाऱ्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं.

या व्यापाऱ्यानं अल्तमशला नोकरासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली. थाटात राहणारा सरदाराचा मुलगा थेट गुलाम झाला. सुरुवातीच्या दिवसात प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या अल्तमशने नंतर परिस्थीतीशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. नंतर अल्तमशला व्यापाऱ्याने बुखारच्या राजाला विकलं. बुखाराच्या राजाने अल्तमशची खरेदी गुलाम म्हणून केली असली तरी त्याला चांगले शिक्षण दिले. नंतर बुखारचा राजा मरण पावल्यानंतर परत त्याच्या वाट्याला जुनं दुःख आलं. त्याची पुन्हा हाकालपट्टी करण्यात आली. अल्तमश पुन्हा एका व्यापाऱ्याच्या पदरी पडला. बुखाऱ्याहून त्याला गझनीला नेण्यात आलं.

पृथ्वीराज चौहानाचा (Prithviraj Chauhan) पराभव करणारा महुम्मद घोरी गझनीच्या तख्तावर होता. अल्तमशचे सौंदर्य आणि त्याची बुद्धी याबद्दल घोरी ऐकून होता. असा गुलाम आपल्याही दरबारी असावा अशी घोरीची इच्छा होती. पण व्यापाऱ्याने मात्र फाजील किंमत मागितली. ही किंमत अति होती बादशाह जाणून होता. त्यानं अल्तमशला खरेदी करायला नकार दिला. स्वतः बादशाह ज्या गुलामाला नाकारतोय तो विकत घेण्याच धाडस इतर लोकं का करतील. व्यापारी हताश होवून अल्तमशला पुन्हा बुखाऱ्याला घेवून गेला.

काही दिवस लोटल्यानंतर मोहम्मद घोरीचा सरदार कुतुबुद्दीन ऐबक (Qutubuddin Aibak) बुखाऱ्याला आला आणि त्यानं अल्तमशला विकत घेतलं. कुतुबुद्दीनच्या कुटुंबातील सर्वांनाच्याच आवडीचा अल्तमश बनला. त्यानं कुतुबुद्दीनची मर्जी कमावली आणि स्वतःला गुलामीतून स्वतंत्र करुन घेतलं. स्वतंत्र झाल्यावर त्यानं नाव कमावलं. वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धीची कमाल दाखवली. दिवसेंदिवस कुतुबुद्दीनच्या नजरेत त्याची किंमत वाढत होती.

अफगाणला घोरीचा मृत्यू झाला. तेव्हा कुतुबुद्दीन दिल्लीत होता. त्यानं दिल्लीला स्वतंत्र घोषित केलं आणि स्वतःची सत्ता स्थापित केली. हा तोच कुतुबुद्दीन ज्यानं दिल्लीत कुतुबमिनार बांधला. कुतुबुद्दीननं नंतर स्वतःच्या मुलीचा विवाह अल्तमशशी केला.

काही दिवसांनी कुतुबुद्दीन मरण पावला. अल्तमशने बुद्धीच्या जोरावर दरबारात स्वतःच स्थान निर्माण केलं होतं. सर्व सरदारांना आधीच स्वतःच्या बाजूने केलं होतं. कुतुबुद्दीनच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना डावलून अल्तमश दिल्लीचा बादशाह झाला.

अशा अल्तमशला बरीच मुलं होती पण त्यात सर्वात प्रसिद्ध होती ती रझिया बेगम (Razia Begum). अल्तमश सुंदर असल्यामुळं त्याची मुलंही सुंदर होती. पण रझिया थोडी जास्तच सौंदर्याशिवाय ती कमालीची हुशार आणि चालाख होती. राजनीतीत तरबेज होती. तिला जाणीवपूर्वक अल्तमशनं रझियाला राजकारभाराचे शिक्षण दिले.

साल उजाडलं १२२६ दक्षिणेतली स्वतंत्र राज्ये दिल्लीच्या बादशाहीच्या ताब्यात असावीत अशी इच्छा अल्तमशची होती. त्याने दक्षिणेवर स्वारी केली. मोठं सैन्य घेवून तो निघाला. या स्वारीत तो विजयी झाला पण सहा वर्षाचा मोठा कालखंड यात गेला. बादशाहच्या गैरहजेरीत रझियाने राजकारभार चालवला.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कुणी स्त्री गादीवर बसून राज्यकारभार चालवत होती. अल्तमश परत आला तेव्हा तिनं कुरबुर केली नाही. गादी मोकळी केली. अल्तमशच्या वाट्याला नंतर फार कमी दिवस आले. दक्षिणेतून परल्यानतंर काही दिवसताच त्याचा मृत्यू झाला.

अल्तमशला त्यावेळी २० पुत्र होते. अत्यंत कमकुवत मनाचा आणि आईच्या शब्दावर चालणारा फिरोज गादीवर आला. तो चैनीखोर होता. मोठे बंड होवू लागले. परिस्थीती हाताबाहेर जाताना पाहून रझियानं पुन्हा गादीवर कब्जा केला.

फिरोजची उचल बांगडी करुन रझिया उत्तम प्रकारे राजकारभार चालवत होती. ज्या अमिर उमरावांनी रझियाची फिरोजची गच्छंती करायला साथ दिली नंतर त्यांचा अंहकार दुखवू लागला. एका स्त्रीच्या आज्ञेनं राजकारभार चालवणे त्यांना जड जावू लागले. सुरुवातीच्या नाराजीनं नंतर उग्र रुप घेतलं आणि कटकास्थानांना सुरुवात झाली.

रझिया चार वर्षे गादीवर होती. स्त्री पोषाख टाकून ती पुरुषांप्रमाणे टोपीत वावरायची. कोणताही आडपडदा न ठेवता उघडपणे ती हत्तीवर बसायची. प्रजेला तिच्यात न्यायी आणि कर्तूत्वशील बादशाह दिसायचा.

राज्यात मोठं बंड झालं. सरदारांनी सत्ता ताब्यात घेवून तुर्की सैन्याकडं रझियाला पाठवलं पण तुर्की सरदाराने तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणली नाही. उलट दोघांनी लग्न केलं. रझियाचा भाऊ बेहराम गादीवर आला.

तो प्रचंड खुनसी, कपटी आणि निर्दयी होता. राज्य परत घेण्यासाठी रझियाने मोठं सैन्य एकत्र केलं. पण एकदा जे तिच दैव फिरलं ते फिरलच. तिचा मोठा पराभव झाला. तिचा पती आणि ती दोघे बेहरामच्या हाती लागले आणि बेहरामनं रझियाचा जीव घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER