काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; सोनिया गांधींची माहिती

Sonia Gandhi

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) संकटामुळे काँग्रेसच्या (Congress) पक्षाध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केल्याची घोषणा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असं आवाहन सोनिया गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे. काँग्रेस कार्यकारी समितीची आज ऑनलाईन बैठक पार पडली.

या बैठकीला संबोधताना सोनिया गांधी म्हणाल्या की, आपण २२ जानेवारीला ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून भेटलो होतो. तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. निडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्याने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरही नाराजी व्यक्त केली. या पराभवातून आता काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असा पराभव का मिळाला? याची माहिती जाणून घेतली पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळवता आली नाही ही धक्कादायक बाब आहे. या अनपेक्षित निकालांची दखल घ्यावीच लागेल. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असं त्या म्हणाल्या. या निकालाने मी व्यथित झाले आहे, असं जर मी म्हटलं तर एकप्रकारे वस्तुस्थिती झाकून ठेवल्याचाच तो प्रकार होईल. आपला इतका वाईट पराभव का झाला याबाबत विचार करायला हवा. या प्रश्नांतून काही न पटणारी उत्तरे येतील. परंतु त्यातून आपण धडा घेतला पाहिजे.

आपण सत्य परिस्थितीला सामोरे गेलो नाही किंवा तथ्यांना योग्य प्रकारे पाहिले नाही तर आपण कधीच धडा घेणार नाही. आसाममधील पराभवाची माहिती जितेंद्र सिंह, पश्चिम बंगालची माहिती जितिन प्रसाद, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूची माहिती दिनेश गुंडुराव आणि केरळची माहिती तारिक अन्वर देतील, असं सोनिया गांधींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोनाचे संकट रोखण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाचं लसीकरण झालं पाहिजे. या संकटाच्या काळात काँग्रेस जनतेच्या सोबत आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशाची आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करण्याची गरज आहे, केंद्राने देशातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे, अशी भूमिकाही स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button