पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दोन सांगलीकरांमध्ये लढत रंगणार

Satish Chavan - Arun Lad

सांगली : पुणे विभागीय पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अरुण लाड (Arun Lad) आणि औरंगाबाद विभागात सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे विभागीय मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी भारतीय जनता पक्षाकडून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) लाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दोन सांगलीकरांमध्ये लढत रंगणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारपर्यंत,ता. १२ आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याकडे उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादीकडून अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, उमेश पाटील, नीता ढमाले यांची नावे चर्चेत होती. उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्यामुळे उमेदवारांसह समर्थकांतही धाकधूक वाढली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास फेसबुक पेजवर यासंबंधी माहिती जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे, ‘विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे.दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे. ’


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER