अर्थव्यवस्था सावरतेय, जीएसटी संकलन वाढले

- सहा टक्के अधिक कर जमा

GST

मुंबई : पूर्णपणे नागरिकांच्या खरेदीवर अवलंबून असलेल्या जीएसटीचे नोव्हेंबर संकलन वाढले आहे. जीएसटीचे संकलन वाढले याचाच अर्थ नागरिकांची क्रयशक्ती वाढली आहे. क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था झपाट्याने सावरत असून मोदी सरकारचे हे यश मानले जात आहे.

घसरत जाणाऱ्या जीडीपीमुळे केंद्र सरकार चिंतेत असताना काहीसा दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. तीन महिन्यांनंतर केंद्र सरकारकडे एक लाख कोटींहून अधिक जीएसटी कर जमा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील हा आकडा असून मागील वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत सहा टक्के अधिक आहे.

ऑक्टोबर महिन्यात देशभरात फक्त ९५ हजार ६३७ कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होतील. तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कर संकलन ९७ हजार ६३७ कोटी रुपये झाले. आता यावर्षी नोव्हेंबरचे संकलन १ लाख कोटी रुपयांच्यावर गेले आहे.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जीएसटी वसुलीमध्ये १९ हजार ५९२ कोटी जमा करण्यात आले. तर, राज्य जीएसटीमधून २७ हजार १४४ कोटी रुपये, एकीकृत जीएसटीतून ४९ हजार, ०२८ कोटी रुपये आणि जीएसटी उपकरातून ७,७२७ कोटी रुपये सरकारकडे जमा झाले. एकीकृत जीएसटीमधून २० हजार ९४८ कोटी रुपये हे आयातीद्वारे वसूल करण्यात आले आहेत. त्याशिवाय, ८६९ कोटी रुपये आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील उपकरातून (सेस) वसूल करण्यात आले आहेत.

याआधी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या जीएसटी कर संकलनात घसरण झाली होती. यावर्षी जीएसटीद्वारे जमा झालेल्या रक्कमेतील ही आतापर्यंत सर्वाधिक चांगली रक्कम आहे.