काँग्रेस-राष्ट्रवादीत दुरावा : दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून अद्यापही पवारांच्या तब्येतीची विचारपूस नाही

sonia gandhi and sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अचानक पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी अद्यापही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे यूपीएच्या अध्यक्ष्यपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत दुरावा वाढत असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार आणि अमित शहा  यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या शरद पवार हे राष्ट्रीय राजकरणात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत.

त्यातच भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाची आघाडी असलेल्या यूपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यूपीएला मजबूत करण्यासाठी शरद पवारांना त्याचे  नेतृत्व द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी याला पुरजोर विरोध केला आहे. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधीच राहतील असे काँग्रेसच्या नेत्यांनी बजावले आहे. आणि यावरूनच काँग्रेस-राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अशात महाराष्ट्रात सत्तेत सहभागी होऊन मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस न केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button