चर्चा तर होणारच ! राष्ट्रवादीच्या आमदाराचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम; त्या मुलांचे पालकत्वही स्वीकारले

Nilesh Lanke

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे सध्या कोरोनाबाधित (Corona) रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. स्वतः उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रत्येक गरजेवर त्यांचं लक्ष आहे. आणि अशातच ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या सेवेसाठी निलेश लंके इथेच मुक्कामाला आले आहेत. तर दुसरीकडे राहुरी तालुक्यातील एका कुटुंबातील आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने दोन लहान मुलांच्या राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र लंके यांनी थेट या मुलांना मी तुमचा मामा आहे, असे म्हणत पालकत्वही स्वीकारले. त्यांच्या या स्तुत्य कार्यामुळे सध्या निलेश लंके चर्चेत आले आहेत.

निलेश लंके कोविड सेंटरच्या माध्यमातून जनसेवा करत असून याच ठिकाणी त्यांचे जेवण होते आणि मुक्कामदेखील करतात. रात्रीबेरात्री एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली किंवा अन्य औषधांची गरज भासली तर ते इथेच उपलब्ध राहून तत्काळ रुग्णाला मदत करतात. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात ते कोविड सेंटरमध्येच जमिनीवर झोपल्याचे दिसून येत आहे. आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहेत. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात.

तर एका कुटुंबातील आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कुटुंबातील लहान भावाबहिणीला कुठे ठेवायचे, असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला. हे कुटुंब नीलेश लंके यांच्या भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी गेल्या सात-आठ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. परंतु उपचार घेत असताना आपल्या कोरोनाबाधित आईने राहुरी येथील भावाला फोनवरून मी व तुझा दाजी कोरोना बाधित असून तुझ्या भाचा-भाचीला आम्ही बरे होईपर्यंत तुझ्याकडे ठेव, अशी विनंती केली. परंतु महिलेच्या भावाने नकार देत आम्ही त्यांना ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांची व्यवस्था तू दुसरीकडे कर, असे ठणकावून सांगितले. या कुटुंबातील प्रमुखांसह या दोन भावाबहिणीचा पुढे मोठा पेच निर्माण झाल्यानंतर ही गोष्ट लंके यांना समजली.

आमदार लंके यांनी या कुटुंबाला आधार देत तुम्ही या ठिकाणी निश्चिंतपणे उपचार घ्या, तुमच्या दोन्ही मुलांचा मी मामा झालेलो आहे. त्यांची जबाबदारी माझी, असे म्हणून सेंटरमध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता असतो त्या ठिकाणी दोन स्वतंत्र बेड लावून दोन्ही भावाबहिणींची गेल्या आठ दिवसांपासून ते सेवा करत आहे. आ. लंके कुटुंबातील सदस्य या नात्याने काळजी घेत आहेत. आ. लंके यांच्या पालकत्वाची चर्चा कोविड सेंटरमध्ये चांगलीच रंगू लागली आहे.

गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कोरोनामुळे माणुसकीला काळिमा फासणार्‍या अनेक घटना ऐकू येत आहेत. अनेक मुले व कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आई-वडिलांसह सदस्यांना पाहात नाही तर दुसरीकडे उपचारासाठी दाखल झालेल्या अनेकदा रुग्णांकडे संपूर्ण कुटुंब पाठ फिरवत आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना आजाराला हरवायचे आहे, माणुसकीला नाही, अशी मार्मिक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी केली आहे.

कुटुंबातील आई-वडील कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी भाळवणी येथील सेंटरमध्ये यावे लागले. त्यामुळे अंगावर असणाऱ्या कपड्यानिशी या दोघा भावाबहिणींनासुद्धा त्यांच्याबरोबर यावे लागले. त्यामुळे लंके यांनी या दोघा भावाबहिणींना नवीन कपडे बुधवारी घेऊन दिले. त्यामुळे या दोन्ही भावाबहिणींसाठी आमदार लंके हे मामाची भूमिका निभावत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button