‘तांडव’च्या दिग्दर्शक, निर्माता, लेखकास मिळाला हंगामी दिलासा

Tandav

मुंबई :- ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शन सुरु झालेल्या ‘तांडव’ (Tandav)या ‘वेब सीरिज’ (Web Series)चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अ‍ॅमेझॉनच्या ‘कन्टेन्ट हेड’ अपर्णा पुरोहित यांना उत्तर प्रदेशातील न्यायालयात  नियमित अटकपूर्व जामीन मागता यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने या चौघांनाही तात्पुरता ‘ट्रान्सिट’ अटकपूर्व जामिन मंजूर केला.

उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे नोंदलेल्या फौजदारी गुन्ह्यावरून अटक करण्यासाठी तेथील पोलीस मुंबईत येऊन दाखल झाले आहेत व ते आपल्याला केव्हाही अटक करतील, अशी भीती व्यक्त करत या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. प्रकाश नाईक यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला. परंतु त्यांनी विनंती केल्यानुसार चार आठवड्यांचा नव्हे तर तीन आठवड्यांचा ‘ट्रान्सिट’ अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे या चौघांना उत्तर प्रदेशात जाऊन तेथील न्यायालयात नियमित अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची सवड मिळेल व तोपर्यंत पोलीस त्यांना अटक करू शकणार नाहीत.

‘तांडव’मध्ये हिंदू देव-देवतांचे जे विकृत चित्रण केले गेले आहे त्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्यात करण्यात आलेल्या जातीवर आधारित चित्रणाने जातीय भावना दुखावल्या आहेत, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्ह नोंदविला आहे. या चौघांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांना यात निष्कारण गोवले गेलेले आहे. ‘तांडव’मध्ये फिर्याद म्हणते तसे आक्षेपार्ह काही नाही. शिवाय फिर्यादीत सरधोपट आणि मोघम विधाने करण्यात आली आहेत. पण नेमक्या कोणती दृश्ये किंवा संवाद भावना दुखावणारे आहेत, याचा त्यांत उल्लेख नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER