संवाद तुमचा माझा

Webinar - Maharashtra Today

दोन दिवसांपूर्वी माझा एक वेबिनार झाला. एक तर वेबिनार म्हणजे नव्या टेक्नॉलॉजीशी ऍडजेस्ट होत सगळं करणं आणि दुसरी गोष्ट पूर्णपणे हिंदीत द्यायचा होता .माझ्यासाठी हे किती दिव्य होते हे घरात सगळ्यांनाच माहिती होते. कारण माझे हिंदी बोलण ,कुणी कामवाले किंवा नवीन शेजारी यांच्याशी किती भयंकर असतं हे सगळ्यांनाच माहिती ! तरीदेखील मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले .भरपूर तयारी करून वेबिनार दिला. सांगायचा मुद्दा हा की जेव्हा मी त्यानंतर नवऱ्याला विचारलं तेव्हा त्याची फर्स्ट रिएक्शन होती ,”सुधारणेला भरपूर वाव आहे .”आणि खरं सांगू, मला जरा वाईट वाटल ,”अरे तुम्ही हे नंतरही सांगू शकता ना .सुरुवातीला जरा तर सकारात्मक काही सांगा.

पण काही लोकांची ही पद्धत असते की ,”मी कसा रिस्पॉन्स द्यायचा सांग. खरा खरा की तुला हवा तसा ?” अशी साधारण आमच्या घरी पद्धत. पण आता ती माहीत झाल्यामुळे त्यांनी छान म्हटल्यावर आकाशालाच हात टेकतात. या प्रसंगानंतर मी स्वतः तो प्रोग्राम ऐकला आणि माझ्या लक्षात आलं की वेबिनार टेक्निकल इश्यू वगळता आणि मला एक आव्हानच असणारा ,या दृष्टीने पुरेसा छान झालाय. मला समाधान वाटते आहे पूर्णपणे ! अर्थात त्यानंतर आता तोच म्हणजे नवरा, मुलांना सांगतो,” अरे साधीसुधी नका समजु तिला, दीड तासाचा वेबिनार देते ती! ते पण हिंदीत ! धाडसी आहे म्हणूनच शक्य आहे !” ( यात कुठेही कुत्सित पणा नसतो तर कौतुक व्यक्त करण्याची त्याची पद्धत मी ओळखते .)नाहीतर नातेवाईकांना फोनवर छान झाला प्रोग्राम म्हणूनही कळवतो.

तसं म्हणाल तर मला एकटी ला खरी प्रतिक्रिया देणे आणि इतरांसमोर कौतुक करणे ही खरंतर एक प्रकारे चांगली गोष्ट आहे .चार चौघात जवळच्या माणसांचे दोष सांगत फिरणं योग्य नाही. तर असो ! संवाद ही मुळातच महत्त्वाची भावनिक गरज आहे माणसाची ! एखादे महत्वाचे काम किंवा अभ्यास किंवा काहीही जीव ओतून केले आणि पलिकडून केवळ काही चांगलं नाहीये किंवा चुकलंय किंवा असलाच काहीतरी आलं , तर त्यासाठी त्यात झीजणाऱ्या व्यक्तीला त्यात रस न उरणे स्वाभाविकच. हे बर्‍याचदा बॉस आणि त्यानंतरची असणारे यांच्यामध्ये , किंवा पालक शिक्षक आणि मुलं यांच्यात सहज दिसते.

एखाद्या भावनिक दृष्ट्या गरज असणाऱ्या व्यक्तीची, एखाद्या अबोल व्यक्तीशी गाठ पडते. आणि तिथे प्रतिक्रिया दाखल फक्त ,हा ! बरोबर आहे .ठीक आहे .बघूया !नको नको !कदाचित ,अशी उत्तरं मिळाली तर ती समोरच्या माणसाला शिक्षाच नाही का ठरत. कष्टपूर्वक वजन उतरवणार्‍या व्यक्ती, किंवा काहीतरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती त्यांची उत्तरादाखल फक्त तर उडवणं किंवा कुत्सित हसणं अशी प्रतिक्रिया जर येणार असेल तर ती व्यक्ती खट्टु होणारच !एवढेच नाही तर कदाचित कोणी तरी आपल्या प्रयत्नांकडेच संशयाने पाहायला लागेल. म्हणजे मी जे काय करते आहे ते खरंच चूक आहे की बरोबर ?

या सगळ्या नात्यांविषयी विचार करताना प्रतिक्रियांना खूप महत्त्व आहे. म्हणूनच त्यांचा प्रयोग सखोलपणे केला जावा. कारण त्यांचा संबंध हा वैयक्तिक आनंद, समाधान त्यातून नात्यांमध्ये येणारी ऊर्जा, नात्यांमधला रसाळपणा या सगळ्यांची आहे. असं वारंवार व्हायला लागलं तर त्याचा निष्कर्ष हाच निघतो कि ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे ,”अमुक एक व्यक्ती मला नेहमीच नावे ठेवते.”

” काहीही केलं तरी माझ्या घरची मंडळी समाधानी होत नाही, “अशी उदाहरणे साधारण विद्यार्थ्यांच्या बाबतीत जास्त निराश करून जातात की घरातल्यांच्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा खूप जास्त असतात त्यावेळी निराशा येते, किंवा काही घरांमध्ये सुनेकडून भयंकर अपेक्षा केल्या जातात आणि मुख्य म्हणजे त्या प्रमाणात एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करायचं असतं, प्रत्येकाला दाद हवीशी वाटते हे मात्र पूर्णपणे दुर्लक्षिल्या जाते किंवा तशी कुणाला सवयच नसते. हाच प्रकार जेव्हा ऑफिसमध्ये होतो, छोट्या छोट्या गोष्टींमधून अपेक्षित असणारे ॲप्रिसिएशन जेव्हा बॉस कडून मिळत नाही, अशावेळी लोक नवीन काम शोधायला बघतात .कारण या कामात आनंद मिळेनासा होतो, ” जिथे कुठलाही बदल केला ,कितीही काम केलं तरी माझी किंमत कोणालाच नाही .”असा सूर निघत असतो.

कधी कधी काही ठिकाणी बोलण्याला काहीच अर्थ नसतो. कारण,”माझं कधीच ऐकल्या जात नाही ,नेहमी कानाआड होतं .” बऱ्याच घरांमधून निर्णय घेणे, काही एक गोष्ट ठरविणे यामध्ये घरातल्या सगळ्यांची मते घेतली जातात असं नाही. घरातला कर्ता पुरुष बरेचदा असे निर्णय घेतो, तेव्हा इतरांच्या सूचना बरेचवेळा कानाआड केल्या जातात. तर काही ठिकाणी चर्चा होतात आणि त्यातून इतके मतभेद आणि वादावादी निर्माण होते, की काही वेळेला ,”आता नकोच ते बोलणं !” इथपर्यंत गाडी येते. वर्षानुवर्ष समजूतदारपणाचा आव आणून समोरच्याला समजण्याचा प्रयत्न केला जातो, पण जेव्हा वारंवार त्याच त्याच चुका, समोरच्याकडून होत राहतात, किंवा एखाद्याशी काही कारणांनी अंडरस्टँडिंग जमत नाही अशावेळी ही उद्विग्नता येते.

अशा या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन गोष्टी आहेत बघा ! कधीकधी फार काळ एकमेकांबरोबर घालविल्यानंतर भावनांना एक प्रकारे बोथट स्वरूप येतं, आणि जो संवाद होतो तो केवळ रूक्ष, शब्दांची भावनांची देवाणघेवाण असं त्याचं स्वरूप होऊन जातं. किंवा कधीकधी परस्परांना खूप ओळखल्यामुळे संवादात एक प्रकारचे गृहीत धरणे हेसुद्धा होते.

मग नुसतच छान छान, गुडी गुडी अशाच नेहमी प्रतिक्रिया द्यायचा का? प्रामाणिक प्रतिक्रिया द्यायचाच नाही का ? असाही प्रश्न काही जणांना पडू शकतो. समोरच्या मध्ये बदल घडवायचा असेल तर प्रामाणिक प्रतिक्रिया द्यायलाच हव्यात. अपेक्षित फक्त एवढेच आहे की ती देण्याची आपली पद्धत काय आहे ? उदाहरणार्थ नव्या सुनेने एखादा पदार्थ केला. तिची उत्सुकता असते सगळ्यांना आवडतो आहे की नाही बघण्याची. आणि तिला प्रतिक्रिया द्यायची आहे. पहिलाच प्रयोग असल्यामुळे काहीतरी कमी-जास्त होणारच. मग अशी प्रतिक्रिया दिली तर, “अरे वा वा ! फारच मस्त झालाय, एकदम चव येते तोंडाला , चटपटीत ! आणि आम्ही पहिल्यांदाच खाल्ला ह हा आम्ही “

कधीतरी हे सांगता येईल की ,”घरामध्ये आजोबा आजी आहेत. तर थोडं स्पायसी कमी कर पुढल्या वेळी , कारण त्यांनाही आवडला तो खायला , फक्त त्रास व्हायला नको एव्हढंच !” आणखीन एक साधं उदाहरण. मीठ कमी झाले हे जर सांगायचं असेल, तर “नीट झालय सगळं पण थोडं मीठ कमी आहे .ते लावून घेता येईल आपण आपलं आपलं !” या दोन्ही उदाहरणांमध्ये हे जे सांगायचं आहे ते तर पोचले पण ते सांगण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.

कुठल्या ऑफिसमध्ये किंवा कंपन्यांमध्ये जिथे वेळा पाळणे अत्यंत गरजेचे असते ,त्यापेक्षा जास्त जे काम जसे हवे तसेच, त्याच पद्धतीने लागते, मग अशावेळी एवढा विचार करणं शक्य नसतं. पण त्यामुळे जर कायमस्वरूपी कामगारांवर ओरडत राहिलो तर सगळे जण एका विशिष्ट ताणाखाली काम करतील, आणि जे करायचं ते पण चांगलं होणार नाही. त्यापेक्षा जे काम केलं आहे चांगलं योग्य त्याला तात्काळ ॲप्रिसिएशन किंवा इन्सेंटिव्ह देणं हे करता येऊ शकतं.

फ्रेंड्स !आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटना घडता क्षणीच आपल्या मनामध्ये जो तात्कालिक विचार होऊन तो व्यक्त होतो ती प्रतिक्रिया ! आणि कुठलीही घटना घडल्यानंतर, जो विचार आला असेल त्यावर सहा सेकंद विचार करून, म्हणजेच सारासार बुद्धीचा वापर करून जो येतो तो प्रतिसाद ! प्रतिक्रियेवर वर फक्तच भावनांचे राज्य असते, प्रतिसादावर भावने बरोबरच विचार काम करतो.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायको थेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button