
अख्खा सिनेमा आणि त्यातले सगळे सीन डोळ्याखालून गेले तरी एखादा डायलॉग डोक्यात फिट बसतोच. एक काळ होता की सिनेमातील नायकाच्या एखाद्या डायलॉगवर फक्त टाळ्याच नव्हे, तर चिल्लर देखील उधळली जायची. डायलॉग हिट होण्यासाठी नायकच पाहिजे असेही नाही तर खलनायकाच्या डायलॉगवर देखील तमाम रसिक जीव ओवाळून टाकायचे आता सिनेमातलं माहित नाही, पण टीव्हीवर आलेल्या मालिकांमधील डायलॉग मात्र हिट होत आहेत. या डायलॉगमुळेच त्या मालिकेतील कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.
जीव झाला येडा पिसा या मालिकेचा नायक अशोक फळदेसाई (Ashok Phaldesai) हा शिवा लष्करे च्या भूमिकेत फिट बसला आहे. शिवा जितका भूमिकेने हिट झाला आहे, तितकाच त्याच्या डायलॉगमुळे देखील चाहत्यांमध्ये प्रचंड हिट आहे. कुठलाही विषय समोर आला की त्यावर चर्चा करायची आणि एकदाच सगळ्यात शेवटी शिवाच्या तोंडी येणारं इषय कट हे वाक्य आता चाहत्यांच्यादेखील सवयीचे झाले आहे. इषय कट असं म्हटलं की शिवा लष्करे हे समीकरण आता पक्कं झालं आहे.
रंग माझा वेगळा या मालिकेत सौंदर्या इनामदार (Saundrya Inamdar) ही भूमिका करणारी हर्षदा खानविलकर ही नेहमीच तिच्या ठसठशीत भूमिकेसाठी ओळखली जाते. यापूर्वीच्या देखील तिच्या भूमिका तिचा लूक आणि तिच्या तोंडी असलेल्या डायलॉगमुळे लोकप्रिय झाल्या आहेत. हीच परंपरा कायम राखत रंग माझा वेगळा या मालिकेत सौंदर्याच्या तोंडी असलेला ब्यूटिफुल हा शब्द तिने खास शैलीत उच्चारत भूमिकेला एक वेगळाच टच दिला आहे. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या देव माणूस या मालिकेतील डिंपल म्हटलं की .. डिम्पलला सिम्पल राहायला आवडत नाही हा तिचा डायलॉग अगदी हिट लिस्टवर आहे. तर सरु आजीच्या तोंडी असलेलं ,मी मस्त खमकी हाय हे वाक्य ऐकण्यासाठी या मालिकेचा चाहतावर्ग अगदी कानात प्राण आणून बसलेला असतो. गेल्या तीन वर्षापासून हिट असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच रणविजय गायकवाड याने चालतंय की हा शब्द तुफान लोकप्रिय केला आहे, आणि अजूनही त्याच्या चालतंय की या डायलॉगची मोहिनी चाहत्यांवर कायम आहे. जीव झाला येडा पिसा या मालिकेतील आत्याबाई या शिवाला नेहमीच शिवा शिवा, माझा देखणा दिवा असं म्हणत असतात. त्यांचाही हा डायलॉग आता घराघरात पोहोचला आहे.
नव्यानेच टीव्हीवर दाखल झालेल्या कारभारी लय भारी या मालिकेतील नायक रघु म्हणजेच निखिल चव्हाण हा एक गोष्ट बोलली की तो ती गोष्ट करतोच असं साधारण त्याचे व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्याच्या तोंडी, बोललो तर बोललो हा डायलॉग लेखकाने दिला आहे आणि तो अल्पावधीतच लोकप्रियही झाला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांच्या संसारात नेहमीच खो घालणारी जाऊबाई शालिनी ही नेहमीच काहीतरी कट कारस्थान रचत असते. या कट कारस्थानात ज्यांना सहभागी करून घेते त्यांना आपला प्लॅन सांगून झाल्यानंतर शेवटी व्हय म्हण की असे म्हणून आपल्या गटात सामील करत असते. तिचा व्हय म्हण की हा डायलॉग तुफान लोकप्रिय झाला आहे.
एखाद्या व्यक्तीरेखेला डायलॉग देताना देखील तो तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा दिला जातो आणि यावर कोणत्याही मालिकेचे स्क्रीन प्ले रायटर खूप मेहनत घेत असतात. केवळ डायलॉग हिट होण्यासाठी काहीतरी शब्द रचायचे म्हणून अशा गोष्टी क्लिक होत नसतात, त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचा ऑनस्क्रीन लहेजा काय आहे त्याचा स्क्रीन प्ले लेखकांना करावा लागतो. सध्या टीव्हीवर सुरु असलेल्या मालिका तिच्या कथेमुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे जितक्या गाजत आहेत तितक्याच प्रत्येक मालिकेतल्या एखाद्या कलाकाराच्या तोंडी असलेला डायलॉग हा मालिकेचा यूएसपी झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला