पक्षांतर्गत चढाओढीच्या राजकारणाने राजापूर तालुक्याचा विकास खुंटला

ShivSena

रत्नागिरी/प्रतिनिधी : राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली राजापूरचे वातावरण तापले आहे. रिफायनरीच्या नावाखाली राजकारण करून श्रेयवाद आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारांमध्ये सुरू आहे. नेत्यांच्या या वर्चस्व आणि कुरघोडीच्या राजकारणात तालुक्याच्या विकासाला मात्र खीळ बसत आहे. विधानसभा निवडणुकीपासूनच स्थानिक आमदार राजन साळवी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेतीलच काही मंडळींनी सुरू केला आहे. रिफायनरीच्या निमित्ताने या प्रकाराने जोर धरला आहे.

दगा फटका टाळण्यासाठी भाजपने बजावला 23 नगरसेवकांना व्हीप

विकास आणि रोजगार निर्मितीच्या मुद्यावर राजापूर तालुक्यातील सागवे देवाचेगोठणे या विभागातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी ग्रीन रिफायनरी व नाटे-आंबोळगड येथील आयलॉग पोर्ट या प्रकल्पांचे समर्थन करत सकारात्मक भूमिका घेतली आहे. या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता, शिवसेनेने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचा बडगा उगारला. याबाबत स्थानिक आमदार राजन साळवी यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेनेच्याच या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पक्षशिस्तीच्या नावाखाली स्थानिक आमदारांचे खच्चीकरण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची कुजबुज शिवसेनेत सुरू असून तालुका प्रमुख नेमके कोणाच्या ईशाऱ्यावर हे करत आहेत असा सवालही आता शिवसैनिकांतून उपस्थित केला जात आहे.

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोध आणि समर्थनातून कुरघोडीचे राजकारण शिवसेनेत सुरू आहेच पण यापूर्वीही तालुक्यातील अनेक विकास कामे मुद्दाम आणि खास करून रस्त्यांची कामे रखडून ठेवण्यासाठी आणि रोष निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे सागरी महामार्गावरील राजापूर तालुक्यातील धारतळे ते आंबेरी पर्यंतचा रस्ता कार्पेट करण्यासाठी मागील मे २०१९ वर्कऑर्डर मिळालेली असतानाही अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. तालुक्याच्या पश्चिमेकडील महत्वाचा असलेल्या रस्त्याची दुर्दशा झालेली असताना बांधकाम विभागाने सुमारे ५० लाख रुपयांचा निधी फक्त खड्डे बुजविण्यासाठी खर्च केला आहे. मात्र वर्कऑर्डर मिळालेल्या ठेकेदाराने अद्यापी या कामाला सुरुवात केलेली नाही. सदरचे काम मुद्दाम तर रखडवले जात असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

परिसराच्या विकासासाठी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे शिवसैनिक म्हणून राबणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांना प्रकल्प समर्थन केल्यामुळे त्याची किंमत मोजावी लागली आहे. मात्र यापूर्वी प्रकल्प विरोधी आंदोलनांप्रसंगी ज्यांनी पक्षप्रमुखांना आणि पक्षाबाबत अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली अशांशी जवळीक करून कुरघोडीचे राजकारण करताना तालुक्याच्या विकासाला मात्र मूठमाती दिली जात आहे असे चित्र आहे. तर समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर टोकाची कारवाई करून आणि आपण नाणार भागामध्ये सभा घेणार असल्याचे सांगत एक प्रकारे स्थानिक आमदार राजन साळवी यांनाच शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेचे मंत्री आणि आमदार करत असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे. या एकूणच प्रकारात आमदार साळवी हे सध्या सावध पवित्र्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते. मात्र त्यांच्या या सावध आणि बोटचेप्या भूमिकेमुळे रत्नागिरीच्या आमदारांच्या कुरघोडीच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामुळे राजापूरचे विकासात्मक बाबतीत मोठे नुकसान होत असून याबाबत विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.