प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही – वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad - School

मुंबई :  लॉकडाऊननंतर आणि कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांतील  काही जिल्ह्यांतील  नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. दिवसेंदिवस विद्यायार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. सुदैवाने कोरोनाच्या कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत  ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चेत दिली. शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येईल.

स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील; कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सचेत असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणताही विचार केलेला नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्यविषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

राज्यातील सुरू झालेल्या शाळांमधील  विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि विद्यार्थी व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढत आहे. नववी ते  अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे. ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय चालू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सध्या जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन व सरकारचे प्रयत्न यामुळे आपण कोरोनाच्या संकटावर मात करून भविष्यातील वाटचाल उज्ज्वल करू, असा दावा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER