औरंगाबादेत साडेसात तासात चार वृध्दांचा मृत्यू बळींची संख्या आता ८२ वर

Death

औरंगाबाद : शहरातील शहागंज, कैलासनगर, खिंवसरा पार्क आणि पिसादेवी भागातील चौघांचा मृत्यू झाला. त्यात दोघांचा कोरोना तर अन्य दोघांचा इतर आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. यात दम लागणे, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

कैलासनगरातील ५६ वर्षीय वृध्दाला २८ मे रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या लक्षणावरून त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. २९ मे रोजी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा २ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. युरेमिक ऐंसेफॅलोपथी विथ बायलॅटरल न्यूमोनिया, ड्युटू कोविड नेफ्रोपॅथी सिव्हयीर सायटोकाईन, स्ट्राम कोविड असोसिएटेड कोएगुलोपॅथी इन नोन केस ऑफ इसचेमिक हार्ट डिसीज हे त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.

शहागंजातील ५४ वर्षीय रहिवाशी मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी उपचार घेत होते. त्यांना २३ मे पासून ताप व खोकला येत होता. तर २६ मे पासून दम लागायला सुरूवात झाली. त्याच्या दुस-या दिवशी २७ मे रोजी दम वाढल्यावर त्यांना घाटीत आणण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांचा स्वॅब पाठविण्यात आला. शरीरात प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात स्थलांतरीत करण्यात आले. छातीच्या एक्स-रे मध्ये फुफ्फुसाचा आजार आणि त्यातच रक्तातील साखर अतिशय वाढलेली होती. त्यावर देखील उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला.

तसेच पिसादेवी रोडवरील गौतमनगरात राहणा-या ६९ वर्षीय महिला रुग्णाला २६ मे पासून दम लागण्यास सुरूवात झाली. त्यांना १२ वर्षांपासून उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. दम वाढल्यावर २९ मे रोजी त्यांना एम्स रुग्णालयात व ट्रामा सेंटर येथे भरती करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना ३१ मे रोजी रात्री घाटीत दाखल करण्यात आले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, रक्तदाब कमी-कमी होत असल्यामुळे डायलिसीस देता आले नाही. त्यांचा आज पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला.

साडेसात तासात चार मृत्यू

घाटीमध्ये गौतमनगर, पिसादेवी रोड, शहागंज आणि कैलासनगर येथील रुग्णांचा मंगळवारी तर एका खासगी रुग्णालयात खिंवसरा पार्क येथील कोरोनाबाधित असलेल्या ६५ वर्षीय वृध्द रुग्णाचा सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २७ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे साडेसात तासात चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत घाटीत ६६, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५ तर मिनी घाटीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER