वडिलांनी केलेल्या दुसर्‍या विवाहाच्या वैधतेस मुलगी आव्हान देऊ शकते

Bombay High Court - Father's second marriage - Maharastra Today
  • धनाढ्य उद्योगपतीच्या प्रकरणात हायकोर्टाचा निकाल

मुंबई : वडिलांनी केलेला दुसरा विवाह बेकायदेशीर आणि अवैध असल्याचे जाहीर करून घेण्यासाठी त्यांची मुलगी कुटुंब न्यायालयात अर्ज करू शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका धनाढ्य उद्योगपतीच्या प्रकरणात दिला आहे. ‘आशापुरा’ समूहातील अनेक कंपन्यांचे संस्थापक आणि मालक व दिवंगत उद्योगपती नवनीतलाल एस. शहा यांच्या नयना एम. रामाणी या विवाहित मुलीने केलेले अपील मंजूर करून न्या. रमेश धानुका व न्या. वीरेंद्रसिंग बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मुंबईतील कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध नयना यांनी हे अपील केले होते. वडिलांच्या दुसर्‍या विवाहास मुलगी या नात्याने आव्हान देण्यास नयना यांना पात्र ठरविल्याने त्यांनी केलेल्या अर्जावर कुटुंब न्यायालयाने नव्याने सुनावणी घेऊन सहा महिन्यांत निकाल द्यावा, असा आदेशही दिला गेला.

दिवंगत नवनीतलाल शहा यांना नयना यांच्यासह तीन मुली व एक मुलगा आहे. नवनीतलाल यांच्या हिरालक्ष्मी या पहिल्या पत्नीचे फेब्रुवारी, २००३ मध्ये निधन झाले. त्यानंतर लगेच त्याच वर्षी त्यांनी फिझा या दाऊदी बोहरा महिलेशी नोंदणी पद्धतीने दुसरा विवाह केला. स्वत: नवनीतलाल यांचे जून २०१५ मध्ये निधन झाले.

नयना यांचा असा आरोप आहे की, फिझा यांनी त्यांचे पहिले पती मन्सूर हातिमभाई छेरवाला यांच्यापासून तलाक न घेताच तलाक घेतल्याचे खोटे सांगून नवनीतलाल यांच्याशी विवाह केला. वार्धक्यामुळे नवनीतलाल शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल झाल्यावर त्याचा गैरफायदा घेत फिझा यांनी नवनीतलाल यांची बरीच स्थावर मालमत्ता व आशापुरा कंपन्यांमधील बहुसंख्य शेअर्स स्वत:च्या नावावर करून घेतले. मृत्यूनंतर मालमत्ता आपल्याला देण्याचे मृत्युपत्रही फिझा यांनी नवनीतलाल यांच्याकडून करून घेतले.

नयना म्हणतात की, वडिलांच्या व्यक्तिगत कागदपत्रांची फाईल पाहिली असता त्यात फिझा व मन्सूर छेरवाला यांच्या कथित तलाकनाम्याचे कागदही त्यात मिळाले. परंतु शहानिशा केल्यावर तो तलाकनामा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी नवनीतलाल यांचा दुसरा विवाह अवैध होता व फिझा या अजूनही मन्सूर यांच्या पत्नी आहेत, असे जाहीर करून घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला.

कुटुंब न्यायालयात फिझा यांनी नयना यांच्या अर्जाला प्रामुख्याने पाच मुद्द्यांवर विरोध केला. एक, विवाहाच्या वैध-अवैधतेसंबंधीचे प्रकरण विवाहातील दोन व्यक्तींपैकीच कोणी तरी एकमेकांविरुद्ध दाखल करू शकते. त्यामुळे ज्याच्या विवाहास आव्हान द्यायचे आहे त्याची मुलगी ते दाखल करू शकत नाही. दोन, विशेषत: त्या विवाहातील एक व्यक्ती (नवनीतलाल) आज हयात नसताना असा अर्ज केला जाऊ शकत नाही. तीन, कुटुंब न्यायालयास मुळात असे प्रकरण ऐकण्याचा अधिकारच नाही. चार, नयना यांनी केलेला अर्ज तीन वर्षांच्या मुदतीनंतर केलेला असल्याने तो कालबाह्य आहे आणि पाच, याआधी नयना यांनी वडिलांच्या मालमत्तेसंबंधी जी दिवाणी प्रकरणे दाखल केली त्यात त्यांनी वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या अवैधतेचा मुद्दा घेतला नाही.

त्यामुळे तो हक्क त्यांनी सोडून दिल्याचे मानायला हवे. कुटुंब न्यायालयाने यापैकी शेवटचा मुद्दा ग्राह्य धरून नयना यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अन्य मुद्द्यांवर निकाल देण्याची वेळच आली नव्हती. अपिलात या सर्व मुद्द्यांचा विचार झाला आणि उच्च न्यायालयाने सर्व मुद्द्यांवर नयना यांच्या बाजूने निकाल दिला. यातील नयना असा अर्ज करू शकते की नाही हा मुद्दा मूलगामी होता. त्यात नयनाला पात्र ठरविताना खंडपीठाने कुटुंब न्यायालय कायद्याच्या कलम ७ मधील क्र. २ च्या स्पष्टीकरणाचा आधार घेतला ते स्पष्टीकरण असे सांगते की, कोणत्याही विवाहाच्या वैधतेचा मुद्दा त्या विवाहातील केवळ दोन व्यक्तीच नव्हेत तर त्यांचे कोणीही हितसंबंधी व लाभार्थीही करू शकतात.

मुलगी ही वडिलांची हितसंबंधी व लाभार्थी असल्याने ती असा अर्ज नक्कीच करू शकते; शिवाय अशा प्रकारची प्रकरणे कुटुंब न्यायालयाखेरीज अन्य कोणत्याही न्यायालयाने ऐकण्यास कायद्याने पूर्ण प्रतिबंध केलेला आहे. त्यामुळे फक्त कुटुंब न्यायालयच असे प्रकरण ऐकू शकते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. या सुनावणीत नयना यांच्यासाठी ज्येष्ठ वकील विनीत बी. नाईक व अ‍ॅड. शेरॉय बोधनवाला यांनी तर फिझा यांच्यासाठी दीप्ती पंडा व नंदिनी चित्तळ या महिला वकिलांनी काम पाहिले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER