देशापुढील संकट अतिशय गंभीर आहे, योग्य विचार करूनच मत द्या : ओवेसी

Owaisi

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. यात ओवेसी मागे नाहीत. मुंबईतील एका सभेत ते म्हणाले, देशावरील सध्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे. परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सारासार विचार करुन योग्यपणे मतदानाचा वापर करावा, असे आवाहन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. धारावी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार मनोज संसारे यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’ प्रसारणावर बंदी

ओवेसी म्हणाले, सरकारने जीएसटी, नोटबंदी करुन सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त करुन टाकले. धारावीतील उद्योजकांना सरकारच्या धोरणांचा मोठा फटका बसला. राहुल गांधी ७० वर्षात विकास न झाल्याची कबुली देतात. काँग्रेसने यूएपीए सारख्या अन्यायकारक कायद्याच्या सुधारणेला भाजपला पाठिंबा दिला. त्याचा फटका दलित, वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी वर्गाला बसत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचे अनिर्बंध अधिकार त्यामुळे सरकारला मिळाले आहेत. नुकसान मात्र सर्व सामान्य जनतेचे झाले आहे.

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. काँग्रेसचा मतदार भाजपकडे वळला आहे आणि काँग्रेस मात्र आमच्यावर टीका करत आहे, असेही ओवेसी म्हणाले. दलित, वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी या वर्गाने एकत्रीत येऊन जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. कुणाच्या मेहेरबानीने नव्हे तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात मुस्लिम समाज आनंदात राहत असून शेवटपर्यंत राहील. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा कुणाच्या मर्जीची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरेंना डोळे तपासण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पाकिस्तान व इतर कोणत्याही मुस्लिम देशांसोबत आमचा संबंध नाही, आमचा संबंध भारत या आमच्या देशाशी असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील धर्मनिरपेक्षता संपुष्टात आली असून भाजपला रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचा आरोपही त्यांनी केला.