भारतातील रेल्वेचं श्रेय इंग्रजांना पण संकल्पना मांडणारा कोण होता मराठी माणूस?

Nana Shankar

भारतात रेल्वे (Railways )इंग्रजांनी जरूर आणली पण ती व्हावी याची संकल्पना मांडून ती पुर्ण केली एका मराठी माणसानं. नाना शंकर (Nana Shankar) शेठ इंग्रजी आणि संस्कृतवर प्रभुत्त्व असणारा दानशूर सावकार अशी त्यांची ओळख होती.

सतारव्या शतकात कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे या नावांना फक्त एखाद्या कसब्याच दर्जा प्राप्त होता. ही ठिकाणं शहरं म्हणून उदयाला यायची होती. ईस्ट इंडीया कंपनीनं कलकत्त्यापासून या शहरांच्या विकासाला सुरुवात केली. हळू हळू त्यांनी भारत ताब्यात घेतला. एकोणीसाव्या शतकात ही शहरं सत्ताकेंद्र बनवली ती इंग्रजांनी.

मुंबईचा पाया रचला जेरॉलड अँगिरयने. तेंव्हा बांधकामाला सुरुवातच झाली होती. मुंबईच्या कोट भागात १७ फेब्रुवारी १८०३ला मोठी आग लागली. त्याने निघून जाण्याऐवजी आग विझवून मुंबई स्थिर स्थावर करण्याचा निर्णय घेतला. एल्फिस्टने लोकल आणली. मुंबई वसवण्यात संपूर्ण श्रेय होते बार्टल फ्रियरचे पण मुंबई इंग्रजांनी वसवली ती इथल्या सावकरांच्या आर्थिक पाठिंब्याच्या जीवावर त्यापैकी एक होते नाना शंकर शेठ.

त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे, ते नाना शंकरशेट या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला.एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक.

इतिहास

त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या आठवणीत पुढं भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली.

नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.नाना शंकरशेट यांनी जवळजवळ पन्नास वर्षाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेटजी जिजीभाईंची छाप पडली होती. भारतात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये शाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते.

ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने उभऊारली. पुढे या संस्थेचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट असं नाव देण्यात आलं.

स्त्री शिक्षणासाठी मोठी भूमिका

बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन भारतीय सभासदांमध्ये सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४५) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४८) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या; १८५७मध्ये, द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरू केले.

१८५५मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.

सतीची प्रथेला विरोध

नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मुंबईच्या विकासासाठी हातभार लावला असला तरी त्या परकिय सत्ताच होत्या. त्यांच्याशी संघर्ष होणं अटळ होतं. १८५७ला बंडाचा भडका उडाला. पण यातून काहीच साध्य झालं नाही. हा लढा उभारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी नव्या साधनांची गरज होती. लोकचळवळ उभी राहिली. ‘ द बॉम्बे असोसिएशन’ या नावानं. बाँम्बे असोसिएशच्या माध्यमातून अनेक हक्काच्या गोष्टी इंग्रजांकडून मिळवल्या आणि अशाच संघटनेच्या एकत्री करणातून पुढं कॉंग्रेस उभी राहिली.

नाना शंकर शेठ खऱ्या अर्थाने मुंबईकर होते. मुंबईच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. वयाच्या ६२ व्या वर्षी ३१ जुलै १८६५ला त्यांनी समाजिक कर्तव्य पुर्ण करत जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER