ब्रेकअपनंतरही एकत्र काम करून या जोड्यांनी दिले हिट सिनेमे

Katrina Kaif - Salman Khan & Amitabh Bachchan - Rekha

बॉलिवुडमध्ये (Bollywood) प्रेम प्रकरणांची कमी नाही. अगदी मूकपटापासून ते आतापर्यंत कलाकारांच्या प्रेमप्रसंगांनी बॉलिवुडमध्ये चर्चा घडवून आणली आहे. सतत सोबत काम करीत असल्याने तसेच कधी कधी विचारही जुळत असल्याने प्रेम वाढीस लागते. मात्र दोघेही कमवत असल्याने किंवा दुसरा/दुसरी चांगली/चांगला मिळाल्याने अगोदरच्या प्रेमाला नाकारून दुसरे प्रेम स्वीकारण्याकडेही अनेक कलाकारांचा कल दिसून आला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे यशस्वी प्रेमप्रकरणांची संख्या बॉलिवुडमध्ये आहे त्यापेक्षा जास्त मोठी संख्या ही ब्रेकअप झालेल्यांची आहे. ब्रेकअप झाले तरी पूर्णपणे प्रोफेशनल असल्याने ब्रेकअप झाल्यानंतरही अनेकांनी एकत्र काम केले आणि केवळ कामच केले नाही तर हिट सिनेमेही दिले आहेत. आज आपण अशाच ब्रेकअप झाल्यानंतरही हिट सिनेमे देणाऱ्या जोड्यांवर नजर टाकूया.

या जोड्यांमध्ये सगळ्यात वर नाव घ्यावे लागेल अमिताभ (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांचे. बॉलिवुडमध्ये या दोघांची लवस्टोरी सगळ्यात जास्त चर्चेत होती आणि आहे. अजूनही हे दोघे एखाद्या कार्यक्रमात किंवा विमानात जरी मागेपुढे बसलेले असले तरी या दोघांमध्ये अजूनही चांगले संबंध आहेत असे म्हटले जाते. रेखामध्ये नंतरच्या काळात जो बदल झाला तो अमिताभच्या प्रेमात पडल्यानंतर झाला असे म्हटले जाते. अमिताभने रेखाला पूर्णपणे बदलून टाकले होते. या दोघांमधली जवळीक सगळ्यांनाच ठाऊक होती. हे प्रकरण फार पुढे जाणार असे दिसल्यावर अमिताभची पत्नी जयाने रेखाला घरी बोलावले आणि अमिताभपासून दूर राहाण्याचा प्रेमळ सल्ला दिला होता असे सांगितले जाते. त्यानंतर रेखा आणि अमिताभ दूर झाले. मात्र यश चोप्रा यांनी 1981 मध्ये जेव्हा सिलसिला सिनेमा सुरु केला तेव्हा त्यांनी मुद्दाम अमिताभ, जया आणि रेखा यांच्या लव्ह ट्रँगलची कथा यात मांडली होती. हे तिघेही प्रोफेशनल असल्याने त्यांनी एकत्र काम केले. या सिनेमातील अमिताभ आणि रेखाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा अमिताभ आणि रेखाला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी झाला नाही.

या यादीतील दुसरे नाव आहे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) जोडीचे. 90 च्या दशकात संजय दत्त आणि माधुरी सुपरहिट जोडी होती. ‘थानेदार’ सिनेमाच्या वेळी ही जोडी जवळ आली आणि त्यांच्यात प्रेम वाढू लागले. या जोडीने ‘साजन’, ‘साहिबा’, ‘महानता’ असे हिट सिनेमे दिले होते. सुभाष घई यांनी त्यांच्या ‘खलनायक’मध्ये म्हणूनच माधुरीची निवड केली होती. संजय आणि माधुरी लग्न करणार असेही म्हटले जात होते. त्यामुळेच सुभाष घई यांनी सिनेमाचे शूटिंग होईपर्यंत लग्न करणार नाही असा करार माधुरी दीक्षितबरोबर केला होता. संजय दत्तही त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे म्हटले जात होते. या सिनेमाचे शूटिंग सुरु असतानाच संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात गेला. जवळ जवळ 16 महिने संजय दत्त तुरुंगात होता. त्यामुळे माधुरीने संजय दत्तशी नाते तोडले. पण ब्रेकअपच्या 18 वर्षानंतर करण जोहरच्या 2019 मध्ये आलेल्या कलंक सिनेमात हे दोघे एकत्र आले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कलंकच साबित ठरला होता.

गेल्या दशकात बॉलिवुडमध्ये सगळ्यात गाजलेली प्रेमी जोडपे म्हणजे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor). 2008 मध्ये आलेल्या ‘बचना ऐ हसीनों’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी हे दोघे जवळ आले होते. सगळीकडे हे दोघे एकत्र दिसत असत. एवढेच नव्हे तर दोघांनी त्यांच्यातील नात्याची कबुलीही दिली होती. दोघेही लग्न करणार असेही म्हटले जात होते. दीपिकाने तर रणबीरच्या नावाचा टॅटूही बनवून घेतला होता. मात्र प्रकरण लग्नापर्यंत गेले नाही आणि दोघांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र दीपिकाने स्वतःला सावरले आणि तीन वर्षांनी अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दीवानी’ मध्ये पुन्हा रणबीरसोबत काम करीत ती किती प्रोफेशनल आहे ते तिने दाखवून दिले. या एक्स कपलची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि हा सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर या दोघांनी इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ मध्येही एकत्र काम केले.

दीपिका-रणबीरप्रमाणेच शाहिद कपूर (Shahid Kapoor)-करीना कपूर (Kareena Kapoor) हे प्रेमी जोडपे बॉलिवुडमध्ये चर्चेत होते. हे दोघेही सगळीकडे एकत्र दिसत. एवढेच नव्हे तर हे दोघे एकमेकांच्या घरीही राहायला जात असत. 2004 मध्ये आलेल्या ‘फिदा’ सिनेमात हे दोघे एकत्र आले आणि त्यांच्यात इलू इलूही सुरु झाले. प्रेमात असताना या दोघांनी ’36 चायना टाउन’ आणि ‘चुप-चुपके’ सिनेमे केले. 2007 मध्ये या दोघांनी ‘जब वुई मेट’ मध्ये एकत्र काम करण्यास सुरुवात केली. पण या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेसच दोघांमध्ये दुरावा झाला आणि दोघे वेगळे झाले. पण प्रोफेशनलिजम दाखवत दोघांनी सिनेमा पूर्ण केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर या दोघांनी ‘उड़ता पंजाब’मध्येही काम केले. पण त्यात ते नायक-नायिका नव्हते.

बॉलिवुडमध्ये मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून सलमान खानची (Salman Khan) ओळख आहे. त्याचीही बॉलिवुडमध्ये अनेक प्रेम प्रकरणे झाली. कॅटरीना कैफने (Katrina Kaif) अमिताभच्या ‘तीन पत्ती’ सिनेमात सेक्सी भूमिका करून बॉलिवुडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर सलमानने कॅटरीना कैफला 2005 मध्ये आलेल्या ‘मैंने प्यार क्यों किया’मधून पुन्हा लाँच केले. हा सिनेमा हिट झाला आणि या दोघांचे मधुर संबंध सुरु झाले. त्यानंतर या दोघांनी ‘पार्टनर’, ‘युवराज’ हे सिनेमे केले. मात्र त्याच दरम्यान कॅटरीनाचे रणबीरसोबत संबंध जुळले आणि ती सलमानपासून दूर गेली. ब्रेकअपनंतर सलमान खानने त्याच्या बहिणीच्या अर्पिताच्या लग्नाला आलेल्या कॅटरीनाचा उल्लेख कॅटरीना कपूर केला होता. यावरून या दोघांमधील संबंध किती बिघडले होते ते समोर आले. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी प्रोफेशनलता दाखवत ‘एक था टायगर’ मध्ये काम केले. हा सिनेमा सुपरहिट झाला. त्यानंतर या दोघांनी ‘टायगर जिंदा है’ आणि ‘भारत’ मध्ये एकत्र काम केले.

या यादीत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या जोडीचेही नाव घ्यावे लागेल. 2010 मध्ये आलेल्या ‘बँड बाजा बारात’ मध्ये हे दोघे एकत्र आले आणि त्यांच्यांत प्रेमांकुर फुलले. त्यानंतर या दोघांनी ‘लेडीज व्हर्सेस रिक्की बहल’ सिनेमात काम केले. या दोघांमध्ये दुरावा आयफा अॅवॉर्डमध्ये रणवीरने सोनाक्षीसोबत केलेल्या एका परफॉर्मंसमुळे आला. रणवीर आणि सोनाक्षी जवळ आल्याचे म्हटले जाऊ लागले त्यामुळे अनुष्का नाराज झाली आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाला. पण ब्रेकअप नंतरह या दोघांनी 2015 ‘दिल धड़कने दो’ मध्ये काम केले आणि हा सिनेमा सुपरहिट झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER