देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; सर्वेक्षणात झाले उघड

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यामधील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच विरोधी पक्ष म्हणजेच भाजपाने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात बोलणं सुरू केलं आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला राज्य सरकारच्या उपाययोजना सपशेल निष्क्रिय ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. तर दुसरीकडे राज्य सरकार कोरोनासंबंधी कामं नियोजनानुसारच केली जात असल्याचं सांगताना दिसत आहेत. असं असतानाच राज्य सरकारला दिलासा देणारी एक आकडेवारी समोर आली आहे.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे. असे वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्राने दिले आहे.

आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केलं. ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणामध्ये देशातील मुख्यमंत्र्यांसंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले. या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटनायक यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले आहे. त्याखालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असण्याचा मान वायएसआर काँग्रेसचे प्रमुख तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) यांना मिळाला आहे. तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना ७६.५२ टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव असून त्यांची लोकप्रियताही उद्धव ठाकरेंपेक्षा कमी आहे. केजरीवाल यांना ७४ टक्के मते आहेत. सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या सहामध्ये केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER