स्वदेशी व स्वावलंबनाच्या आधारावर देश आत्मनिर्भर व्हावा : नितीन गडकरी

  • ‘कोविड काळात अग्रगण्य भारतातील परिस्थिती’ यावर संवाद

नागपूर : कोविडचे संकट हे जागतिक आहे. सर्वच क्षेत्रांना या संकटाचा फटका बसला असला तरी सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने हे युद्ध आपण जिंकूच. या काळात सर्वच क्षेत्रांत आयात कमी करून निर्यात वाढवून स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या आधारावर देश आत्मनिर्भर व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

‘कोविडच्या काळात अग्रगण्य भारतातील परिस्थिती’ या विषयावर रा.स्व. संघ इंदोर उद्योग श्रेणी प्रमुख संपर्क विभाग यांच्यातर्फे आयोजित एका आभासी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. वास्तविक स्वातंत्र्यानंतर अनेक संकटांचा सामना करून त्यावर भारतीय समाजाने विजय मिळविला आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- कोविडच्या संकटातही समाजात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. या काळात आलेल्या संकटांचा सामना करताना देश आत्मनिर्भर व्हावा, अशी शिकवण दिली आहे. या काळातच देशात आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली. एकूण देशाने सर्वच क्षेत्रांत स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या आधारावर आत्मनिर्भर व्हावे असा अनुभव या संकटात आला, असेही ते म्हणाले.

आत्मनिर्भर म्हणजे काय, तर आयात कमी करून निर्यात वाढविणे, तरुणांना रोजगार मिळावा, कृषी व ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी वाढवा, ग्रामीण भागात नवीन उद्योगांची निर्मिती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नवीन तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहचवले जावे, उद्यमशीलता वाढावी, ज्ञानाचे व कचर्‍याचे संपत्तीत रूपांतर व्हावे म्हणजेच आत्मनिर्भर होणे, असे सांगताना गडकरी म्हणाले- १.४० लाख कोटींचे खाद्यतेल आपल्याला आयात करावे लागते. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबियांचे उत्पादन अधिक घ्यावे लागेल. म्हणजे आयात कमी होईल. क्रूड तेलाची आठ लाख कोटींची आयात कमी करण्यासाठी जैविक इंधनाचा वापर वाढवावा लागेल. इथेनॉलचा वापर वाढला तर ही अर्थव्यवस्था मोठी होणार आहे. आयात कमी करून भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत करायची आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक मोठी कामे करता येऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राची दरवर्षी ६.५ लाख कोटींची उलाढाल आहे. या क्षेत्रातून ५० टक्के उत्पादन निर्यात केले जाते. येत्या दोन वर्षांत या क्षेत्राची उलाढाल १० लाख कोटींपर्यंत नेण्याचे आपले प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

कोविड संक्रमणाच्या काळातील अनुभवाने मेडिकल डिवाईस पार्क बनविण्याची गरज निर्माण झाली. या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात लागणारी उपकरणे देशात निर्माण व्हावी, याकडे लक्ष वेधताना गडकरी म्हणाले- तंत्रज्ञानामुळे देश बदलू शकतो. दुसर्‍या देशात ज्या वस्तू तयार होतात, त्या आपण का तयार करू शकत नाही, याचा विचार व्हावा. स्वदेशी व स्वावलंबनाच्या आधारावर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संपूर्ण देश बदलू शकतो. स्मार्ट शहरांप्रमाणे स्मार्ट गावेही निर्माण करू शकतो. आम्हाला लागणार्‍या सर्व वस्तू देशातच निर्माण व्हाव्या. उत्पादनाच्या दर्जाशी कोणताही समझोता न करता हा देश आयात करणारा नव्हे तर निर्यात करणारा व्हावा, असेही गडकरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button