चित्रपटासाठी खर्च कोट्यावधी, कमाई मात्र अर्धीही नाही

चित्रपटासाठी खर्च कोट्यावधी, कमाई मात्र अर्धीही नाही

बॉलिवुड (Bollywood) म्हणजे भव्य दिव्य असे काही तरी. अनेक निर्मात्यांना वाटते की आपण भरपूर खर्च करून म्हणजेच कोट्यावधींचा खर्च करून चित्रपट बनवला की तो प्रेक्षकांना आवडतो. यासाठी मुघले आझम, अनारकली अशा भव्य दिव्य चित्रपटांची उदाहरणे दिली जातात. पण प्रत्येक निर्माता के. आसिफ बनू शकत नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्यावर निर्मात्यांनी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला पण कमाई अर्धीही करू शकले नाहीत.

आमिर खान परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्याचे चित्रपट शक्यतो फ्लॉप होत नाहीत. अर्थात ही गेल्या काही वर्षातली गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळात आमिरचे अनेक चित्रपट फ्लॉप झालेले आहेत. तर अशा आमिरचा दोन वर्षांपूर्वी आलेले ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. खरे तर आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या कथेपासून ते दिग्दर्शनापर्यंत हस्तक्षेप करीत असतो. अर्थात चित्रपट चांगला व्हावा म्हणूनच त्याचे हे प्रयत्न असतात. असे असतानाही यशराजसारखे बॅनर, अमिताभ बच्चन यांच्यासारखा अभिनेता सोबत असतानाही स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानकावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्याच शोला नाकारले. जवळ-जवळ 220 कोटी रुपये खर्च करून तयार झालेला हा चित्रपट 2018 च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला. मात्र आतापर्यंत हा चित्रपट फक्त 150 कोटी रुपयेच कमवू शकला आहे.

प्रख्यात निर्माता बोनी कपूरही भव्य दिव्य चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहात असे. भाऊ संजय कपूरला लाँच केलेला ‘प्रेम’ चित्रपट असो, ‘मि. इंडिया’ असो वा ‘रूप की रानी चोरों का राजा’ असो. बोनी कपूर भरपूर पैसे खर्च करीत असे. त्याने अनिल कपूर आणि श्रीदेवीला घेऊन ‘रूप की रानी चोरों का राजा’ या खर्चिक चित्रपटाला सुरुवात केली. सतीश कौशिक दिग्दर्शित या चित्रपटासाठी जवळ जवळ साडे नऊ कोटी रुपये त्या काळात म्हणजे 1993 मध्ये खर्च करण्यात आले होते. बोनी कपूरने कुठेही हात आखडता घेतला नव्हता. पण या चित्रपटाने फक्त अडीच कोटी रुपयांचाच व्यवसाय केल्याने बोनी कपूरला मोठा फटका बसला होता.

शाहरुख खान आणि करिना कपूर अभिनीत ‘अशोका’ हा सम्राट अशोकाच्या जीवनावरील चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शाहरुख खान, गौरी खान आणि जूही चावला यांनी केली होती. संतोष सीवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी शाहरुख खानने जवळ जवळ 28 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र प्रेक्षकांनी शाहरुखच्या या अशोकाकडे सपशेल पाठ फिरवली आणि चित्रपट सुपरफ्लॉप झाला. चित्रपटाने खर्चाच्या निम्मेही कलेक्शन गोळा केले नाही.

याच शाहरुखचा साय फाय चित्रपट ‘रा वन’सुद्धा असाच बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला होता. हॉलिवूडच्या आणि रजनीकांतच्या सुपरहिट चित्रपट ‘रोबोट’च्या धर्तीवर शाहरुखने ‘रा वन’ ची निर्मिती 130 कोटी रुपये खर्च करून केली होती. परंतु हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला नाही. शाहरुखला अपेक्षा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम करेल परंतु असे काहीही झाले नाही.

लगान, स्वदेस असे उत्कृष्ट आणि भव्य चित्रपट करणाऱ्या आशुतोष गोवारीकरनेही ऋतिक रोशनला घेऊन मोहनजोदारो चित्रपट तयार केला. स्वतः आशुतोषनेच याची निर्मिती केली होती. मोहनजोदारो काळातील या ऐतिहासिक चित्रपटात ऋतिकसोबत पूजा हेगडे या नव्या मुलीला नायिका म्हणून समोर आणण्यात आले होते. 120 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 58 कोटी रुपयांची कमाई केली होती.

2017 मध्ये विशाल भारद्वाजनेही ऐतिहासिक कथेवर आधारित ‘रंगून’ चित्रपटाची निर्मिती केली होती. यासाठी 80 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. शाहीद कपूर, कंगना राणावत अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शनही विशालनेच केले होते. पण प्रेक्षकांना काही हा चित्रपट आवडला नाही आणि केवळ 23 कोटी रुपयांचीच कमाई हा चित्रपट करू शकला.

Bombay Velvet - Wikipediaअनुराग कश्यपने हॉलीवूडच्या चित्रपटावर आधारित मल्टीस्टारर चित्रपट ‘बॉम्बे वेलवेट’ची निर्मिती केली. रणबीर कपूर अभिनीत या चित्रपटासाठी श्रीलंकेत मोठा सेट लावण्यात आला होता. करण जोहरने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी 110 कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याने कमाई केवळ 23 कोटीच होऊ शकली होती.

याशिवायही असे अनेक चित्रपट आहेत. पण स्थानाअभावी सगळ्यांचेच उल्लेख करणे शक्य नसल्याने महत्वाच्या चित्रपटांचीच यादी येथे दिली आहे. तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये या यादीत भर घालू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER